जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी भैरवी पलांडे - bhairavi palande elected as director jalgaon milk federation | Politics Marathi News - Sarkarnama

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी भैरवी पलांडे

भरत पचंगे
सोमवार, 9 मार्च 2020

....

शिक्रापूर : आमदार स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी त्यांची कन्या भैरवी अपूर्व पलांडे-इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून कार्यकाल गाजविलेल्या आमदार स्मिता वाघ व भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा जळगाव जिल्हा भाजपावर चांगलाच दबदबा होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत लोकसभेसाठी स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा होवून त्यांची उमेदवारी रद्द करण्याचे राजकारण राज्यात गाजले.

याच दरम्यान वाघ दांपत्याची आर्किटेक्ट व उच्चशिक्षित असलेली मोठी मुलगी भैरवी हीचा विवाह पुण्यातील शिवसेना नेत्या जयश्री पलांडे व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्थ अ‍ॅड.अशोकराव पलांडे या दांपत्याचा इंग्लंडमध्ये एलएलएम शिकलेला मुलगा अ‍ॅड.अपूर्व पलांडे-इनामदार याचेबरोब झाला व त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिल्याने हा विवाहसोहळा गाजला. त्यातच जळगावातील जेष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे व डॉ.गिरीश महाजन या दोघांनाही समान अंतरावर ठेवून वाघ दांपत्याची राजकीय वाटचाल चांगली चालली असतानाच उदय वाघ यांचे तीन महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले.

अंमळनेर तालुका दूध संघाच्या स्थापनेसह जळगाव जिल्हा दुध संघात बडे प्रस्थ समजल्या जाणा-या दिवंगत वाघ यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्धा दुध संघाच्या संचालकपदाच्या रिक्त जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रीया पार पडली. त्यात स्वर्गिय वाघ यांची मोठी मुलगी सौ. भैरवी अपूर्व पलांडे-इनामदार हीची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती आमदार स्मिता वाघ यांनी दिली. दरम्यान सौ. भैरवी हिच्या निवडीबद्दल तिचा विशेष सत्कार जळगाव जिल्हा दूध संघाच्या सभागृहात नुकताच झाला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख