bhagwan kate left swabhimani | Sarkarnama

राजू शेट्टींचा शिलेदार चंद्रकांतदादांनी फोडला!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

दौलत देसाई हेही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयालाच कुलुप ठोकून पक्षाचा राजीनामा दिलेल्या महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ. संगीता खाडे, राजू शेट्टी यांचे बिनीचे शिलेदार भगवान काटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.

दरम्यान, कॉंग्रेसकडून कोल्हापूरमधून उत्तरमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले दौलत देसाई हेही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा बूथ लेवल कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात काटे व सौ. खाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. श्री. काटे हे "स्वाभिमानी' च्या स्थापनेपासून संघटनेत होते. त्यांच्यावर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांचा भाजप प्रवेश शेतकरी संघटनेला मोठा धक्का आहे. सौ. खाडे या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या होत्या. तसेच राष्ट्रवादीच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष होत्या 

श्री. देसाई हे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत व शिक्षणमहर्षी कै. एम. आर. देसाई यांचे नातू आहेत. त्यांनी कोल्हापूर उत्तरमधून कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतू त्यांना डावलून कॉंग्रेसने उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना ऐनवेळी पक्षाची उमेदवारी दिली. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीतून त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. 31 ऑगष्ट रोजी त्यांचा कॉंग्रेस प्रवेश झाला होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख