बीड जिल्हा परिषदेत कॉंग्रेस, शिवसेनेला सत्तेचा वाटा मिळणार का ?

महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत सत्तांतर होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्ष - उपाध्यक्षपद मिळाले आहे. आता चार विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी होणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीतच पदांसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.
 बीड जिल्हा परिषदेत कॉंग्रेस, शिवसेनेला सत्तेचा वाटा मिळणार का ?

बीड : राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग बीड जिल्हा परिषदेतही यशस्वी झाला आणि जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता घालविण्यात यश आले. अध्यक्ष - उपाध्यक्ष ही दोन्ही पदे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदरात पडली आहेत. विषय समित्यांच्या चार सभापतींच्या निवडी बाकी असल्या तरी या पदांसाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना व कॉंग्रेसला सत्तेचा काही वाटा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला कमी जागा मिळाल्या. परंतु, त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस, शिवसंग्रामचे विनायक मेटे, शिवसेना व कॉंग्रेसची मोट बांधून भाजपने सत्ता मिळविली. सर्वाधिक जागा जिंकूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेपासून दूर राहिली. यावेळी मात्र राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. अगदी राष्ट्रवादीसह शिवसेना, कॉंग्रेस तर एकत्र आलेच शिवाय भाजपच्या सदस्यांना फोडण्यातही मंत्री धनंजय मुंडे यांना यश आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, युद्धाजित पंडित यांच्यासह शिवसेनेचे चार, मागच्या वेळी भाजपसोबत असणारे कॉंग्रेसचे मावळते सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासह भाजपच्या मावळत्या सभापती शोभा दरेकर, शोभा नवले यांनीही महाविकास आघाडीला साथ दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले. 

जिल्हा परिषदेच्या शनिवारी झालेल्या निवडीत राष्ट्रवादीच्या शिवकन्या सिरसाट अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे उपाध्यक्ष झाले. आता चार विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी होणे बाकी आहे. परंतु, या समित्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच रस्सीखेच सुरु आहे. अध्यक्षपद धनंजय मुंडे यांच्या समर्थकाला गेले आहे. तर, लोकसभा लढविणाऱ्या आणि मागच्या वेळी बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांना अपात्र करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून बजरंग सोनवणे यांना उपाध्यक्षपद मिळाले आहे. आता चार सभापतीपदांमध्ये दोन पदांची मागणी प्रकाश सोळंके यांच्या गटाकडून होत आहे. त्यांचे जिल्हा परिषदेत सर्वाधिक नऊ सदस्य आहेत. तर, संदीप क्षीरसागर यांचेही दोन सदस्य असल्याने त्यांच्याकडूनही एक सभापतीपद मागीतले जात आहे. 

बाळासाहेब आजबे यांनीही भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या मावळत्या शोभा दरेकर यांच्यासाठी जोर लावला जात आहे. या राष्ट्रवादीतील रस्सीखेचीमुळे शिवसेनेचे युद्धाजित पंडित व आणि कॉंग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांच्या वाट्याला काय येणार असा प्रश्न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com