beed why does laxman pawar help vinayak mete to organise public meeting? | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विनायक मेटेंच्या मेळाव्याला भाजप आमदार लक्ष्मण पवारांनी केलेल्या मदतीचे इंगित काय ?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

गेवराई मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यात भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यापेक्षा शिवसेनेचे बदामराव पंडित यांना अधिक मान मिळाल्याने पवार समर्थक नाराज झाले होते. विनायक मेटे यांच्या ऊसतोड मजूरांच्या मेळाव्याला जागा उपलब्ध करुन देण्यासह नगराध्यक्षांची उपस्थिती हा अप्रत्यक्ष इशारा तर नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.

बीड : शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या मेळाव्याला भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी जागा उपलब्ध करुन तर दिलीच शिवाय मेळाव्याला त्यांचे समर्थक नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. 

विशेष म्हणजे, ऊसतोड मजूर आणि मुकादम हा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकारणाचा कणा समजला जात आहे. विनायक मेटे यांच्या याच आव्हान देण्याच्या विषयाला मदत केल्याने त्याची चर्चा करण्याबरोबरच राजकीय अर्थही काढले जात आहेत. 

गेवराई मतदार संघाचे राजकारण कायम पंडित आणि पवारांभोवती फिरत असते. विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचे आजोबा आणि वडिलांनी गेवराई मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. नगराध्यक्ष राहीलेले लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करुन बदामराव पंडित यांचा पराभव केला. जिल्ह्यात सर्वाधिक ६० हजारांच्या फरकाने विजय मिळविण्याचा विक्रमही पवारांच्या नावेच आहे. त्यानंतर त्यांनी मतदार संघातील ग्रामीण रस्ते आणि स्वस्त धान्याचे वितरण या कळीच्या मुद्द्यांना हात घातला. त्यामुळे एका घटकात त्यांची लोकप्रियता कायम आहे. म्हणूनच कि काय नेत्यांच्या पुढे - पुढे करण्याची जिल्ह्यातील भाजपची पद्धत त्यांना जमत नसावी. 

जिल्हा परिषद निवडणुकीत बदामराव पंडित यांच्या समर्थक शिवसेना सदस्यांनी भाजपला पाठींबा दिला. त्या बदल्यात बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धाजित पंडित यांना बांधकाम सभापतीपद मिळाले. मात्र, तेव्हापासून बदामराव पंडित व युद्धाजित पंडित यांची भाजपनेत्या पंकजा मुंडेंशी राजकीय जवळीक अधिकच वाढली आहे. पंकजा मुंडेंच्या अनेक कार्यक्रमांत दोघांचीही हजेरी असते. 

नुकताच गेवराई मतदार संघात पंकजा मुंडेंच्या झालेल्या दौऱ्यातही या राजकीय जवळीकीचे प्रतिबिंब उमटले. मतदार संघात लक्ष्मण पवार भाजपचे आमदार असताना दौऱ्यावर शिवसेनेच्या बदामराव पंडित आणि युद्धाजित पंडित यांचीच छाप दिसली. अगदी मुंडेंच्या दौऱ्याचे होर्डींग आणि बॅनर लावण्यापासून मुंडेंचे भोजनही बदामराव पंडित यांच्याकडेच झाले. यामुळे लक्ष्मण पवार समर्थक नाराज असल्याची चर्चा होतीच. मात्र, चर्चेपलिकडे याचे पडसाद उमटले नाहीत. 

पंकजा मुंडेंच्या राजकारणाचा कणा असलेल्या ऊसतोड मजूर - मुकादम या विषयात विनायक मेटे यांनी लक्ष घातले. विशेष म्हणजे मेळाव्याचे ठिकाण लक्ष्मण पवार यांची कै. माधवराव पवार खासगी बाजार समिती होते. तर, मेळाव्याला पवार समर्थक नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ यांच्यासह भाजपचे स्थानिक नेतेही हजर होते. विनायक मेटे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच लक्ष्मण पवार यांचे मदतीबद्दल आभार तर मानलेच. शिवाय सामान्यांवरील अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना पवार घरण्याने राजकारणाच्या पलिकडे जाऊन कायम मदत केली. त्यासाठी राजकीय परिणामांची तमाही बाळगली नाही हे विनायक मेटे यांचे वक्तव्यातूनही राजकीय अर्थ काढले जात आहेत. 

सध्या राजकारणात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात ३६ चा आकडा असताना लक्ष्मण पवार यांनी मेटेंच्या मेळाव्याला मदत करुन नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा तर दिला नाही ना अशीही चर्चा सुरु झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख