पिंजऱ्यात कोंडलेला शिवसेनेचा वाघ बीडमध्ये काय डरकाळी फोडणार?

पुर्वी युतीत शिवसेनेकडे भाजपपेक्षा एक जागा अधिक होती. भाजप नेतृत्वाने इतर जागांच्या बदल्यात हळुहळू शिवसेनेला बीड मतदार संघापुरते मर्यादीत केले. कधी काळी बीडमध्ये गुरगुर करणारा शिवसेनेचा वाघ मागच्या निवडणुकीत ५० हजारांच्या फरकाने थेट तिसऱ्या स्थानावर उडी माररावी लागली. .
पिंजऱ्यात कोंडलेला शिवसेनेचा वाघ  बीडमध्ये काय डरकाळी फोडणार?

बीड : युतीत सुरुवातीला डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेच्या वाघाला भाजप नेतृत्वाने राजकीय कौशल्याने बीड पुरत्या पिंजऱ्यात कोंडून ठेवले. बीडमध्येही गुरगुर करणारा शिवसेनेचा वाघ मागच्या वेळी तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. आता युती तुटल्यानंतर गेवराईत थोडीबहुत असलेली शिवसेनेच्या वाघाची गुरगुर भाजपच्याच इशाऱ्यावर असल्याने शिवसेनेचा वाघ स्वबळाची डरकाळी कशी फोडणार असा प्रश्न आहे. 

मरगळ, गटबाजी आणि विजयापेक्षा उमेदवार शोधण्यासाठीच कसरत करावी लागणाऱ्या शिवसेनेच्या वाघाला युती झाल्यापासून आणि युती तुटल्यानंतरही सत्तेच्या टॉनिकसाठी भाजपच्या ‘हाता’कडे पाहण्याची वेळ सरलेली नाही. 
सुरुवातीला भाजप - सेनेची सुरुवातीला युती झाली तेव्हा सात पैकी चार जागा शिवसेनेकडे होत्या. माजलगावमधून बाजीराव जगताप यांनी पक्षाच्या उमेदवारीवर तर आष्टीतून साहेबराव दरेकर व गेवराईतून बदामराव पंडित यांनी शिवसेनेच्या पाठींब्याने विजय मिळविला. मात्र, जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाचा राज्यभर विस्तार होऊ लागला तशी जिल्ह्यातील शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे धोरण सुरु झाले. 

युतीत राज्यातील एखादा मतदार संघ शिवसेनेला देऊन बीड जिल्ह्यातील एखादी जागा भाजपकडे घेतली जाऊ लागली. अखेर जिल्ह्यात डरकाळी फोडणारा शिवसेनेचा वाघ बीड मतदार संघापुरता मर्यादीत झाला. मतदार संघ पुनर्रचनेत सहा पैकी केवळ बीडची एक जागा शिवसेनेकडे तर पाच जागा भाजपकडे असे सुत्र झाले. त्यातही बीडच्या वाघाने डरकाळी फोडायची कि नाही याची चावी परळीत गेली. दरम्यान, बीडधून प्रा. सुरेश नवले यांच्या माध्यमातून दोनदा तर प्रा. सुनिल धांडे यांच्या माध्यमातून एक अशी तीनवेळा जोराची डरकाळी फोडली. मात्र, युतीच्या काळात सुरेश नवले यांना मंत्रीपद भेटले तशी जिल्ह्यातील संघटना हळुहळू कमकुवत झाली.  २००९ पर्यंत जिल्ह्यात शिवसेनेची बीडमध्ये डरकाळी आणि उर्वरित जिल्ह्यात गुरगुर अशी स्थिती होती. पण, पुढे पक्षाची भलतीच केविलवाणी अवस्था झाली. 

राज्यात युतीत असलेल्या पक्षाला जिल्ह्यात दुय्यम स्थान असे. उपकार केला असे पद आणि सत्तेतील वाटा भाजपकडून दिला जाई. त्यामुळे संघटन विस्ताराला मोठ्या मर्यादा आल्या. एकूणच सुरुवातीपासून शिवसेनेच्या वाघाला पिंजऱ्यात कोंडून ठेवण्यासाठीचे सर्व अस्त्र भाजप वापरे आणि त्यात यशही मिळे. दरम्यान, मागच्या वेळी युती तुटल्यानंतर उमेदवार शोधताना नाकी नऊ आलेल्या शिवसेनेला केज मतदार संघात तर उस्मानाबाद जिल्ह्यातून कल्पना नरहिरेंना आयात करण्याची वेळ आली. एकमेव बीडमध्ये डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेच्या वाघाला तिसऱ्या स्थानावर आणि तेही ५० हजार मतांच्या फरकाने पराभव चाखावा लागला. त्यामुळे होता नव्हता तोही आत्मविश्वास गळून गेला. नंतर सत्तेत बसलेल्या शिवसेनेकडून जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी काही चांगले टॉनिकचे डोस भेटतील ही अपेक्षाही फोल ठरली. 

दुष्काळात जलसंधारणाची कामे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, आरोग्य शिबीरे आणि बुथ बांधणी आणि स्थानिक विषयांवरील आंदोलनांच्या माध्यमातून नवे शिलेदार आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांनी शिवसेनेचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, तो एखाद्या मतदार संघात पक्षाला यशाची पायरी चढविल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. दरम्यान, राष्ट्रवादीतून पक्षात आलेले बदामराव पंडित यांच्यामुळे जिल्हा परिषदेत पक्षाला सभापतीपद आणि गेवराई पंचायत समितीची सत्ता मिळाली असली तरी गेवराईच्या शिवसेनेची सुत्रे परळीतूनच हालतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाने भाजप विरोधी निर्णय घेतला तर त्यांच्याकडून पक्षाला मदतीची अपेक्षा अगदीच कमी मानली जात आहे. लोकसभा उमेदवार म्हणून चर्चा व्हावी असे एकही नाव पक्षात नाही अशी पक्षाची ताकद असल्याने पक्ष डरकाळी कशी फोडणार असा प्रश्न आहे. एकूणच युती असतानाही शिवसेनेचा वाघ कोंडलेला ठेवण्यात यश मिळविलेल्या भाजपने युती तुटल्यानंतरही हाच फॉर्म्युला राबविला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com