कर्जमाफीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीचे मुंडण - Beed Shivsena Aandolan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

कर्जमाफीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीचे मुंडण

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जून 2017

मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काल केली. परंतु, सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी आग्रही मागणी मुंडण आंदोलनाच्या वेळी महिला आघाडीने केली.

बीड - शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असतांनाच त्यात आता महिलांनी देखील उडी घेतली आहे. बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करत सरकारचा धिक्कार व निषेध केला. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, संपात सहभागी व्हा, असेआदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले होते.

महाराष्ट्र बंदमध्ये देखील शिवसेनेचा मोठा सहभाग होता. या पार्श्‍वभूमीवर बीड शिवसेना महिला आघाडीने मुंडण करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जोरदार मागणी सरकारकडे लावून धरली. खरीप हंगाम तोंडावर आहे, राज्यात कोणत्याही क्षणी मान्सूनचे आगमन होईल अशावेळी कर्जमाफी देऊन शेतकऱ्याला दिलासा सरकारकडून मिळणे गरजेचे आहे. परंतु, मुख्यमंत्री वेळ मारून नेत असल्याचा आरोप करत बीड शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत मुंडण केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या अॅड. वंदना चव्हाण, स्वाती जाधव, संगीता चव्हाण आदी महिला कार्यकर्त्यांनी मुंडण करत मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्जमाफी व अन्य मागण्यासाठी राज्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर आहे. त्यामुळे शहरांकडे जाणारा भाजीपाला,दुध व फळांची रसद बंद झाली आहे. सरकार बधत नसल्याने व संप मागे घेतल्याचे परस्पर जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला होता. 5 जून रोजी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काल केली. परंतु, सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी आग्रही मागणी मुंडण आंदोलनाच्या वेळी महिला आघाडीने केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख