बीड जिल्ह्यातले असेही पुतणे : काकांच्या विजयासाठी जीवाचे रान करणारे !

गेवराईचे पंडित - पवार हे नातेवाईक आहेत. शिवराज पवार आणि पृथ्वीराज पंडित हे आते भाऊ - मामेभाऊ आहेत. नात्यातलेच पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित आणि शिवराज पवार हे पुण्यातील बिशप या कॉन्व्हेंट शाळेत एकत्र शिकले आणि रहायलाही एकत्रच होते. पण, आता आपल्याकाकांसाठी ते एकमेकांच्या विरोधात असतील.
Beed-Nephues-striving-hard- for uncles
Beed-Nephues-striving-hard- for uncles

बीड  : राजकारणात ‘काका - पुतण्या’ नातं कोणासाठी नवखं नाही. अगदी राज्यात ठाकरेंच्या घरातून सुरु झालेली ‘काका - पुतणे’ मालिकेची कडी मुंडे व क्षीरसागरांच्या निमित्ताने बीडपर्यंतही पोचली. परंतु, आगामी विधानसभा रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांच्या निवडणुक तयारीकडे नजर मारली तर काका विजयी व्हावेत यासाठी पुतणे जिवाचे रान करत आहेत. विशेष म्हणजे एकत्र राहून शिकलेले, एका ताटात जेवलेले पुतणे आपल्या काकासाठी आता एकमेकांच्या विरोधात तयारी करत आहेत. 

ऋषीकेश आडसकर, जयसिंह सोळंके, रणवीर पंडित, पृथ्वीराज पंडित व शिवराज पंडित ही राजकीय घराण्यांतली तिसरी पिढी सध्या विधानसभेच्या तयारीसाठी काकाच्या खांद्याला खांदा लाऊन मेहनत घेत आहे. 

जिल्ह्यात सोळंके, पंडित, आडसकर हे प्रमुख घराण्यांपैकी एक आहेत. पवारांनीही गेवराई मतदार संघात आपले कायम वजन टिकवून ठेवलेले आहे.दरम्यान, आता या नेत्यांचे वारसदार या विधानसभेच्या तयारीसाठी आतापासूनच रिंगणात आहेत. त्यांना पुतण्यांचीही खंबीर साथ ही त्यांची जमेची बाजू आहे. 

दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर हे राज्याच्या राजकारणातले सर्वपरिचित व्यक्तीमत्व. दिवंगत जेष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांचा पराभव आणि ‘हाबाडा‘ शब्दामुळे त्यांची राज्यात ओळख निर्माण झाली. आता माजलगाव मतदार संघातून त्यांचे चिरंजीव अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर भाजपकडून तयारी करत आहेत.

त्यांचे गावदौरे, संवाद, भेटी अशा नित्यक्रम सुरु आहे. त्यांच्या साथीला पुतणे ऋषीकेश आडसकर यांचीही फौज आहे. गावचे सरपंच राहीलेले ऋषीकेश आडसकर सध्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत. काकांप्रमाणे तेही रोज मतदार संघातील चार - पाच गावांचा दौरा करत आहेत. 

दिवंगत लोकनेते सुंदरराव सोळंके हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री. त्यांचे चिरंजीव माजी मंत्री प्रकाश सोळंके हे देखील माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादीकडून मैदानात असणार आहेत. पिक विमा, पीक कर्ज अशा शेतकरी प्रश्नांवरील आंदोलनांसह त्यांचेही नियमित संवाद - भेटी असे दौरे सुरु आहेत.

त्यांच्या साथीलाही पुतणे जयसिंह सोळंके यांची युवा टिम आहे. जयसिंह सोळंके हे एकदा पंचायत समितीचे उपसभापती आणि आता जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. जयसिंह सोळंके देखील विविध आंदोलनाचे नेतृत्व आणि संवाद - भेटीतून काकांसाठी वातावरण पुरक करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांची राजकीय कारकिर्द गेवराई मतदार संघातून घडली. त्यांचे धाकटे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह पंडित हे देखील यावेळी गेवराईतून राष्ट्रवादीकडून लढणार आहेत. दुष्काळी शेतकरी, निराधारांच्या प्रश्नांवरील आंदोलनांसह मेळावे,संवाद दौरे, पिक पाहणी आणि सार्वजनिक जयंत्यांचे आयोजन अशा माध्यमातून त्यांनी मतदार संघाची मशागत सुरु केली आहे. 

त्यांच्या साथीला तर जेष्ठ बंधू माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पुत्र रणवीर आणि दुसरे जेष्ठ बंधू जयभवानी कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंह पंडित यांचे चिरंजीव पृथ्वीराज पंडित हे दोन पुतणे आहेत. रणवीर पंडित हे सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून मतदार संघात कार्यरत आहेत. युवकांचा चांगले संघटन त्यांनी मतदार संघात केले आहे. तर, पृथ्वीराज पंडित देखील लग्नसमारंभ, जयंती, युवकांचे मेळावे आदी माध्यमातून मतदार संघात कार्यरत आहेत.

दिवंगत माजी आमदार माधवराव पवार यांचे चिरंजीव आमदार लक्ष्मण पवार हे सध्या भाजपकडून गेवराई मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. याखेपेसाठीही त्यांची जोरदार तयारी सुरु आहे. विकास कामांच्या माध्यमातून त्यांची आगामी निवडणुकीची पायाभरणी सुरु आहे. त्यांच्या मदतीलाही त्यांचे बंधू बाळराजे पवार यांचे चिरंजीव शिवराज पवार उतरले आहेत. शिवराज पवार देखील लग्नसमारंभ, युवकांच्या भेटी, मेळावे आदी माध्यमातून मतदार संघात सक्रीय झाले आहेत.

शिकले सोबत आता विरोधात

दरम्यान, गेवराईचे पंडित - पवार हे नातेवाईक आहेत. शिवराज पवार आणि पृथ्वीराज पंडित हे आते भाऊ - मामेभाऊ आहेत. नात्यातलेच पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित आणि शिवराज पवार हे पुण्यातील बिशप या कॉन्व्हेंट शाळेत एकत्र शिकले आणि रहायलाही एकत्रच होते. पण, आता आपल्या
काकांसाठी ते एकमेकांच्या विरोधात असतील. 

रणवीर हे लंडन येथील लिड्स विद्यापीठातून क्रीडा विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत. तर, पृथ्वीराज यांनी फ्लेम विद्यापीठात एमबीए केलेले आहे. शिवराज पवार यांचे सध्या  वाणिज्य शाखेतून शिक्षण सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com