मतदानाच्या दिवशी मुंडे व आडसकर मतदान केंद्राच्या पायऱ्यावर बसून चर्चा करत होते

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपण लहान होतो. त्यावेळी आपण दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत परळीतील कन्या शाळेच्या मतदान केंद्रावर गेलो. त्याठिकाणी मुंडे साहेबांच्या विरोधात निवडणुक लढविणारे दिवंगत बाबूराव आडसकर भेटले. दोघेही मतदान केंद्राच्या पायऱ्यावर बसून खुप वेळ चर्चा करत होते. हा फोटो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात पहिल्या पानावर आला होता.- पंकजा मुंडे
Munde-Adaskar
Munde-Adaskar

केज (जि. बीड) : जिल्ह्याच्या राजकरणात स्वकतृत्वाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन आपल्या ग्रामीण रांगड्या शैलीने ग्रामीण जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारे दिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर हे दिलदार आणि स्पष्टवक्ते होते.

दिवंगत गोपीनाथराव मुंडे व दिवंगत बाबूराव आडसकर यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढविली. परंतु, त्यांनी वैयक्तिक  नात्यात कधी दुरावा आणला नाही. एकमेकांच्या विरोधातील हे नेते मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील पायऱ्यांवर एकमेकांशी चर्चा करत बसले होते. याचा फोटो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर प्रसिद्ध झाला होता, अशी आठवण राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगीतली.

दिवंगत लोकनेते माजी आमदार बाबूराव आडसकर यांच्या पुण्यस्मरणा निमित्त तालुक्यातील आडस येथे झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आडसकर यांची कार्यपद्धती आणि मुंडे - आडसकर घराण्यातील मैत्रीच्या नात्याला उजाळा दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघातील निधनानंतर मला भेटायला येणारे दिवंगत बाबुराव आडसकर हे पहिले नेते होते. स्पष्टवक्ते असलेले आडसकर हे मतापासून कधीही दुर गेले नाहीत. दिवंगत मुंडे आणि त्यांच्यातल्या नात्यात एकमेकांच्या विरोधात लढूनही अंतर पडले नाही. १९९५ साली दोघे जुन्या रेणापूर मतदार संघातून एकमेकांच्या विरोधात लढले. मतदानाच्या दिवशी दोघांची योगायोगाने परळीतल्या कन्या शाळेतल्या मतदान केंद्रावर भेट झाली. 

त्यावेळी मी  लहान होते  परंतु दिवंगत मुंडेंसोबत मतदान केंद्रावर गेलो होते. दोघेही हसतुखाने भेटले आणि मतदान केंद्राच्या पायऱ्यांवर गप्पा मारत बसले. यातून जुन्या नेत्यांचा दिलदारपणा दिसतो. रमेश आडसकर यांच्या भाजप प्रवेशानंतर आपण दिवंगत आडसकर यांना भेटल्यानंतर त्यांनी ‘आता आपण निश्चिंत झालो’ अशी प्रतिक्रीया आणि विश्वास व्यक्त केला होता. त्याला तडा जाऊ देणार नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

 दिवंगत आडसकर यांनी आपल्याला जिल्ह्याच्या राजकारणातील अनेक बारकावे आणि काही नेत्यांबद्दल त्यांची असलेली मते सांगीतली होती. ती खरी निघाल्याचेही पंकजा मुंडेंनी नमूद केले. बाबुराव आडसकर यांचा सामान्य जनतेच्या कल्याणासाठीचा वसा व वारसा चालविण्यासाठी मी व रमेश आडसकर काम करणार आहोत. पालकमंत्री म्हणून आडसकरांच्या पाठीशी पुर्ण ताकदीनीशी उभी राहणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com