गांधी घराण्याच्या 'गुडबुक'मधल्या रजनी पाटलांची खासदारकी कायम राहणार का?

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारीवर विजय निश्चित आणि खुद्द पंतप्रधान मोदींकडून भावी मंत्री, अशी घोषणा झालेली असतानाही काँग्रेसमध्ये जायच्या निर्णयात तसूभरही न ढळल्याने खासदार रजनी पाटील सोनिया गांधींच्या 'गुडबुक' मध्ये आहेत. आता राहूल गांधींसोबतही त्या पहिल्या रांगेत दिसतात.
गांधी घराण्याच्या 'गुडबुक'मधल्या रजनी पाटलांची खासदारकी कायम राहणार का?

बीड : भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारीवर विजय निश्चित आणि खुद्द पंतप्रधान मोदींकडून भावी मंत्री, अशी घोषणा झालेली असतानाही काँग्रेसमध्ये जायच्या निर्णयात तसूभरही न ढळल्याने खासदार रजनी पाटील सोनिया गांधींच्या 'गुडबुक' मध्ये आहेत. आता राहूल गांधींसोबतही त्या पहिल्या रांगेत दिसतात.

रजनी पाटलांची गांधी कुटूंबियांबद्दल असलेली एकनिष्ठता आणि त्यागामुळे त्या गांधी घराण्याच्या जवळच्या आहेत. काही दिवसांनी त्यांची राज्यसभेची मुदत संपत आहे. नव्या नियुक्तीसाठी स्पर्धा असली तरी त्यांची गांधी कुटुंबियांशी असलेली जवळीकता पाहता त्यांना पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता आहे.

लहानपणीच त्यांना यशवंतराव चव्हाणांसारख्या सुसंस्कृत नेत्याच्या अंगाखांद्यावर खेळायचे भाग्य लाभले. विनोबा भावेंच्या मानसकन्या निर्मला देशपांडे यांच्या 'रचनात्मक समाज' चळवळीत सहभागी असल्याने त्यांना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटून संवाद साधता आला. 'आयर्न लेडी'चाही प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर पडला आणि तेव्हापासूनच त्या गांधी कुटूंबियांकडे आकृष्ट झाल्या.  

राजीवजींकडून पहिल्या भेटीच्या तक्रारीची दखल
महिला सक्षिमकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी महिलांनी राजकारणात सक्रीय होण्याचे आवाहन करत होते. पण, तत्कालिन एनएसयुआयच्या राष्ट्रीय अध्यक्षाची महिला - युवतींशी वागण्याची पद्धत चुकीची असल्याची बाब काही युवतींनी रजनी पाटलांच्या कानी घातली. त्यांनी पुण्याहून थेट दिल्ली गाठत राजीव गांधींची भेट घेऊन हा प्रकार कानी घातला. दुसऱ्या दिवशी ट्रेनने परत पुण्याच्या स्थानकावर उतरुन वर्तमानपत्र हाती घेऊन वाचत असताना संबंधीत अध्यक्षाची पदावरुन उचलबांगडी झालेली होती. विशेष म्हणजे राजीव गांधींची व त्यांची ही पहिलीच भेट होती.

मंत्रीपदाची ऑफर आणि सोनियांच्या गुडबुकमध्ये
राजीव गांधींच्या हत्येनंतर काही वर्षे गांधी कुटुंबिय राजकारणात सक्रीय दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी 'प्रशिक्षण काळापुरती' माझी कन्या भाजपकडे पाठवत असल्याच्या दिवंगत गोपीनाथ मुंडेंसाबेतच्या अलिखीत करारानुसार त्या भाजपमध्ये गेल्या. दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांचा पराभवही त्यांनी केला. दरम्यान, काँग्रेसमध्ये सक्रीय होताना कोणाची साथ मिळू शकते याची चाचपणी सोनिया गांधी करत होत्या. सोनियांच्या मागे उभे राहणाऱ्यांत रजनी पाटील सुरुवातीच्या नेत्यांमधल्या होत्या. दरम्यानच, त्यांचे काँग्रेसमधील पुन्हा आगमन आणि तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचा बीड दौरा एकाच वेळी होता. भाजपच्या खासदार असल्याने वाजपेयींच्या सभेला उपस्थित राहण्याबद्दल त्यांनी सोनियांचा सल्ला घेतला. उपस्थित रहा, या सोनियांच्या सुचनेवरुन त्या वाजपेयींच्या व्यासपीठावर गेल्या. त्या पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या वाजपेयींनी 'बीडकी बेटी अबकी बार केवल सांसदही नही, बल्की मंत्री बनेगी', असे भाषणात जाहीर केले. तसे, बीड लोकसभेची जागा भाजपला पुरक आणि पुन्हा अटल बिहारी वाजपेयींचे सरकार येणार असेही वातावरण होते. त्यामुळे रजनी पाटलांनी भाजपमध्येच थांबावे, मंत्रीपद मिळेल, असा सुर त्यांच्या सल्लागार आणि समर्थकांनी लावला. पण, सोनिया गांधींना दिलेल्या शब्दामुळे मंत्रीपदाची थोडीही आशा त्यांना वाटली नाही आणि त्यांचे काँग्रेसकडे जाणारी पावले थबकली नाहीत. म्हणूनच त्या काँग्रेसच्या सुकाणू समितीमध्ये नसल्या तरी सोनिया गांधींच्या गुडबुकमध्ये कायम राहील्या.

आता राहूल गांधींच्याही शेजारच्या खुर्चीवर
काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून राहूल गांधींच्याही त्या शेजारच्या खुर्चीवर दिसतात. राहूल गांधींनी दिलेले पहिले स्नेहभोजन असो वा त्यांच्या नेतृत्वाखालील संसदेवरील संविधान बचाओ आंदोलनात त्या गांधींच्या शेजारीच दिसतात. तर, राहूल गांधींच्याच अध्यक्षपदानंतर त्यांच्या उपस्थितीत झालेल्या 'आय ॲम करेज' या कार्यक्रमातही त्यांना राहूल गांधींच्या शेजारचीच खुर्ची होती.

खुद्द राहूल गांधींनीच काढला सेल्फी
नेतृत्वासोबत सेल्फी काढण्याची हौस आणि पुढे - पुढे करण्याची सवय हा राजकारणात नवा पायंडा सुरु झाला आहे. मात्र, रजनी पाटलांचे फेसबुक पेज पाहिल्यानंतर खुद्द राहूल गांधींनी रजनी पाटलांसोबत काढलेला सेल्फी आढळतो.

सोनियांचा जिव्हाळा अन् भावणाऱ्या सोनिया
परदेशातून आलेल्या सोनियांनी पती राजीव गांधींसाठी स्वत:च्या आयुष्यात केलेला बदल खरा रजनी पाटलांना भावतो. शिर्डीत साई दर्शनाला आलेल्या सोनियांना पुजाऱ्याने मराठीतून प्रदक्षिणा घालण्याचे सांगीतले. त्यावर रजनी पाटलांनी सोनियांना इंग्रजीतून सांगितले. त्यावर सोनियांनी परिक्रमा क्या.. ये तो मुझे मालूम है.. असे सांगितले. शिवराज पाटलांच्या घरी सोनिया गांधींसोबत फोटोसाठी गर्दी झाली. मात्र, सोनिया गांधींनी स्वयंपाक बनविणाऱ्या महिलांना बोलावून त्यांच्यासोबत फोटो घेतले. आजही स्वतःची पर्स त्या स्वतःच सांभाळतात. एकदा बीड दौऱ्यावर आलेल्या सोनियांचा रजनी पाटलांच्या घरचा मुक्काम सुरक्षेच्या कारणांनी टळला. सकाळी रजनी पाटील विश्रामगृहावर भेटायला गेल्यानंतर सोनिया गांधींनी रजनी पाटलांच्या चेहऱ्यावरील भाव अचूकपणे हेरले. हेलिकॉप्टरकडे जाण्यासाठी बाहेर पडताच सोनियांनी मुख्यमंत्री व इतर नेत्यांना थांबवून रजनी पाटलांना गाडीत घेतले आणि चालकाला त्यांच्या घरी जाण्याची सुचना दिली. या १० मिनिटांच्या भेटीत पाहुणचार घेण्याऐवजी त्यांनी डोळेभरुन घर पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com