Beed : NCP special planning | Sarkarnama

बीडमध्ये राष्ट्रवादीचे "स्पेशल छब्बीस'

बीडमध्ये राष्ट्रवादीचे "स्पेशल छब्बीस' सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 मार्च 2017

गटात नोंदणी झालेल्या सर्व सदस्यांकडून राष्ट्रवादीने शपथ पत्र लिहून घेतले आहे. सभागृहात गट नेत्याच्या आदेशाचे पालन केले जाईल याची हमी या शपथपत्राद्वारे घेण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे पक्ष फुटीचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर गट नोंदणीला महत्व प्राप्त झाले आहे. 

बीड : दगाबाजी आणि फोडाफोडीचा इतिहास असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्यावेळी दगाफटका होऊ नये याची विशेष काळजी राष्ट्रवादीकडून घेतली जात आहे. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्‍चित होताच राष्ट्रवादीच्या 25 आणि एक अपक्ष अशा 26 सदस्यांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी गटनेते बजरंग सोनवणे यांनी केली आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी सोबत असलेल्या कॉंग्रेसचे तीन विद्यमान सदस्यांनी मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या गटात सहभागी न होता "हात' दाखवला आहे. 

जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वाधिक 25 सदस्य असलेल्या राष्ट्रवादीकडून निकालाच्या दिवसापासूनच गट नोंदणीच्या हालचाली सुरू होत्या; मात्र विविध गटातटात विखुरलेल्या सदस्यांच्या एकत्रित स्वाक्षऱ्या मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. सत्तेचे गणित जुळवण्यासाठी राष्ट्रवादीने आष्टीतील अपक्ष सदस्य अश्विनी निंबाळकर यांना गळ घातली होती. त्यांनी होकार दर्शवल्यानंतर त्यांना गटात घेण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली. तर कॉंग्रेसच्या 3 सदस्यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण गटात येणार नाही अशी भूमिका घेत राष्ट्रवादीला गॅसवर ठेवले आहे. अखेर बुधवारी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले 25 आणि एक अपक्ष अशा 26 सदस्यांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. 

शपथपत्र लिहून घेतले 

गटात नोंदणी झालेल्या सर्व सदस्यांकडून राष्ट्रवादीने शपथ पत्र लिहून घेतले आहे. सभागृहात गट नेत्याच्या आदेशाचे पालन केले जाईल याची हमी या शपथपत्राद्वारे घेण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे पक्ष फुटीचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर गट नोंदणीला महत्व प्राप्त झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख