beed ncp | Sarkarnama

बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

बीड : संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीला सोबत घेण्यावरुन राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेल्या वादावादीचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड काही तासांवर आलेली असतांनाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकच खळबळ उडवून दिली आहे.

बीड : संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीला सोबत घेण्यावरुन राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेल्या वादावादीचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड काही तासांवर आलेली असतांनाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकच खळबळ उडवून दिली आहे.

 जिल्हा परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येऊन त्यांचा अध्यक्ष विराजमान करण्याचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बहुमत तर दूर पण स्वतःचे संख्याबळ राखणे देखील अवघड होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी उघडपणे भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतल्याने बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण झाले आहे. 

संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीला सोबत न घेता देखील बहुमताचा आकडा गाठू अशी हमी देऊन देखील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काकू-नाना आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुखावलेल्या नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला. क्षीरसागरामध्ये लागलेल्या या वादाचा पुरेपूर फायदा उचलत सुरेश धस यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेत पक्षाला आणखीनच अडचणीत टाकले. क्षीरसागर घराण्यातील अंतर्गत राजकारणाचा फटका बसू नये म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेल्या सोळंके गटानेही चलो भाजपचा नारा देत तसा आग्रह माजीमंत्री प्रकाश सोळंके यांच्याकडे धरला आहे. 

धनंजय मुंडेंना श्रेय नको म्हणून... 
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे 60 पैकी सर्वाधिक 26 सदस्य निवडून आले. तर त्यांच्यासोबत आघाडी करुन दोन आणि इतर एक असे तीन सदस्य कॉंग्रेसचे विजयी झाले. पक्षातून बंडखोरी करत निवडणूक लढवणाऱ्या सभापती संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी 31 संख्याबळ लागणाऱ्या राष्ट्रवादीकडे 26 सदस्य झाले होते. तर तत्कालीन परिस्थितीत भाजपकडे केवळ 20 सदस्य होते.

शिवसेना आणि शिवसंग्रामचे प्रत्येकी चार सदस्य असले तरी ते भाजपसोबत येतीलच याची खात्री नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता येणार असे चित्र असल्याने पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. यामध्ये सर्वाधिक नऊ समर्थक सदस्य असल्याने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके यांची उमेदवारी निश्‍चित झाली. पण, तिकडे परळीत पंकजा मुंडेंना धूळ चारल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची गाडी अगदीच सुसाट चालली होती. या सर्व घडामोडीतून धनंजय मुंडे हे एकटेच क्रेडिट घेत असल्याने दुखावलेल्या पक्षाच्या माजी मंत्री सुरेश धस यांनी थेट भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर समर्थन देण्यासाठी भाजपकडे रांग लागली आहे. पक्षाचे गटनेतेही राष्ट्रवादीसोबत आहेत का नाही याची खात्री देता येणार नाही एवढे अविश्‍वासाचे वातावरण राष्ट्रवादीमध्ये निर्माण झाले आहे. 
धस ठरणार किंगमेकर 
धस यांच्या पाच सदस्यांसह शिवसंग्राम आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार असे एकूण 33 सदस्य झाल्यानंतर कॉंग्रेसच्या दोन सदस्यांनीही राष्ट्रवादीला हात दाखवला आहे. तसेच राष्ट्रवादीचे इतरही चार सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी संदीप क्षीरसागर यांची आघाडी राष्ट्रवादी सोबत असली तरी त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला 25 मते तरी मिळतील की नाही याची शाश्‍वती राहिलेली नाही. तर धस यांच्या भूमिकेमुळे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके या देखील अडचणीत सापडल्या आहेत. सुरेश धस यांच्या धक्कातंत्रामुळे राष्ट्रवादीतील इतर सदस्य देखील सैरभैर झाले आहेत.

प्रकाश सोळंकें यांच्या समर्थकांनी भाजपकडे जाण्याचा आग्रह धरला असला तरी पक्षाने आपल्याला उमेदवारी देऊन सन्मान केला अशी भूमिका घेत त्यांनी राष्ट्रवादी सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर बीड जिल्हा परिषदेत सुरेश धस हेच किंगमेकर ठरणार एवढे मात्र निश्‍चित. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख