बीडमध्ये पुतण्या ठरणार 'जायंट किलर' की काकांचे  'डावपेच वरचढ'  ? - Beed: Jaydatta Kshirsagar Vs Sandip Kshirsagar | Politics Marathi News - Sarkarnama

बीडमध्ये पुतण्या ठरणार 'जायंट किलर' की काकांचे  'डावपेच वरचढ'  ?

दत्ता देशमुख 
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

अटीतटीच्या बीडमधील निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसांत पैसे वाटप करताना आढळल्याचा आणि बाहेरुन मतदान आलेला प्रकार समोर आल्याची चर्चा झाली असली तरी त्याचा फायदा - तोटा यावरच निकाल अवलंबून असल्याचे बोलल्या जाते.

बीड : मातब्बर काकांसमोर दंड थोपटलेल्या संदीप क्षीरसागर यांनी जोरदार लढत दिली. तर, काका जयदत्त क्षीरसागर यांनीही सर्वच डावपेच खेळत निवडणुक लढविली. उद्या मतमोजणी आणि निकाल असून दोघांच्याही समर्थकांकडून २० हजारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 त्यामुळे राष्ट्रवादीचे पुतणे संदीप क्षीरसागरजायंट किलर ठरणार कि शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांचे डावपेच यशस्वी ठरणार हे गुरुवारी  दुपार पूर्वीच कळणार आहे.

काकांना आव्हान देणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी नगर पालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत चमकदार कामगिरी केली होती. विधानसभा निवडणुक लढवायचीच याची तयारीही ते मागच्या तीन वर्षांपासून करत होते. संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी भेटण्याचा अंदाज आल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मंत्रीपदही मिळविले. 

दरम्यान, या काका - पुतण्यांमध्ये प्रचारात जोरदार घामासान झाले. संदीप क्षीरसागरांनी आचारसंहिता लागण्यापूर्वीच शहरात ‘डोअर टु डोअर’ केले. ग्रामीण भागातही त्यांची कार्यकर्त्याची तगडी फळी आहे. त्यांच्या बाजूने अर्धा डझन माजी आमदारांची फौज उभारली. मात्र, संदीप क्षीरसागर यंत्रणेत कमी पडल्याचे बोलल्या जाते. 

तर, जयदत्त क्षीरसागर यांनीही नव्या - जुन्या शिवसैनिकांची मोट बांधत जोरदार खिंड लढविली. क्षीरसागर मुक्तीचा नारा देणाऱ्या भाजपसह इतर मित्रपक्षांची मदत मिळविण्यातही त्यांना यश आले.  त्यांची यंत्रणा मात्र तगडी होती. 

दोन क्षीरसागरांव्यतिरिक्त रिंगणात उतरलेल्या एमआएम आणि वंचितसह ३२ उमेदवार कुणाच्या मुळावर उठणार हा देखील महत्वाचा मुद्दा आणि राजकीय डावपेचाच भाग आहे.
 दोघांनीही ताकदिनीशी लढविलेल्या निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपलेला असला तरी मतदानानंतरही दोघांचे समर्थक २० हजारांनी विजय होणार असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे मातब्बर काकांवर मात करत संदीप क्षीरसागर क्षीरसागर जाईंट किलर ठरणार कि मातब्बर काका जयदत्त क्षीरसागर यांचे डावपेच यशस्वी ठरणार हे काही तासांनीच कळणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख