बीडमध्ये पुतणे संदीप क्षीरसागर ठरले जायंट किलर

एकदा दहा हजारांचे मताधिक्क्य घेणाऱ्या संदीप क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांच्यात एकदा तर फक्त ५८ मतांचा फरक होता. १६ व्या फेरीनंतर संदीप क्षीरसागर यांचे मताधिक्क्य घटत होते. परंतु, २६ व्या फेरीत त्यांनी विजयी आघाडी घेतली
Sandip Kshirsagar - Jaydatta Kshirsagar
Sandip Kshirsagar - Jaydatta Kshirsagar

बीड : मातब्बर काका जयदत्त क्षीरसागर यांना मात देत पुतणे संदीप क्षीरसागर बीडचे बाजीगर ठरले आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धाकधुक वाढविणाऱ्या या निवडणुकीत आणि मतमोजणीत अखेरच्या क्षणी संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली. बीडचा सस्पेन्स उशिरापर्यंत चालला. 

मागच्या वेळी राष्ट्रवादीकडून एकमेव विजयी झालेले जयदत्त क्षीरसागर लोकसभा निवडणुकीत आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेले. शिवसेनेने मंत्रीपद आणि त्यांना उमेदवारीही दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर केली होती. जिल्ह्यात बीड हा शिवसेनेचा एकमेव मतदार संघ आहे. क्षीरसागरांपूर्वी येथून तीन वेळा शिवसेनेचा विजय झालेला आहे. खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनाही शिवसेनेच्या सुरेश नवले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. 

दरम्यान, काका पुतण्यांतील लढत अगदीच अटीतटीची आणि रंगतदार झाली होती. संदीप क्षीरसागर यांना निवडणुकांचा अनुभव असला तरी विधानसभेच्या फडात ते प्रथमच उतरले होते. त्यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दोन्ही काकांना लढत देत नेत्रदिपक कामगिरी केली होती. परंतु, विधानसभेच्या फडात काका जयदत्त क्षीरसागर यांच्यापुढे त्यांची यंत्रणा, अनुभव आणि इतर बाबी कमी पडल्याचे बोलले जात होते. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे मंत्रीपदासह सर्वच यंत्रणा तगडी होती. दोघांनीही आपापल्या परीने ताकद लावत निवडणुक लढविली. 

दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी घेणारे जयदत्त क्षीरसागर बीड शहराची मोजणी सुरु झाल्यानंतर दहा हजार मतांनी पिछाडीवर गेले. ही आघाडी संदीप क्षीरसागर यांच्यासाठी निर्णायक ठरली. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात जयदत्त क्षीरसागर यांना प्रतिसाद भेटल्याने फेरीनिहाय संदीप क्षीरसागरांचे मताधिक्क्य घटत होते. शेवटच्या चार फेऱ्यांत तर साडेचार हजारांचे मताधिक्क्य असलेले संदीप क्षीरसागर हजार मतांनी मागे पडत होते. त्यामुळे दोन्ही क्षीरसागरांच्या समर्थकांची धाकधुक चांगलीच वाढली होती. परंतु, अखेर जयदत्त क्षीरसागर यांच्यावर मात करण्यात संदीप क्षीरसागर यशस्वी ठरले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com