beed district maratha kranti morcha | Sarkarnama

बीड जिल्ह्यात दोन आंदोलक गंभीर जखमी, गेवराईत दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यात आले. दुचाकी फेरी आणि पदयात्रा काढून बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापारपेठा आणि वाहतूक पुर्णपणे ठप्प होती. आंदोलकांनी काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळले. मुख्यमंत्र्यांचा पुतळाही जाळला. 

बीड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, बंदच्या कारणावरुन परळीत मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. तर, गेवराईत दोघांनी तहसिल कार्यालय इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. नांदूरघाट (ता. केज) येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. 

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी बुधवारी परळीत पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघून सुरु झालेले ठिय्या आंदोलन मंगळवारी सातव्या दिवशीही सुरुच आहे. दरम्यान, काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. परळीत बंदचे आवाहन करत निघालेल्या दुचाकीफेरीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये आकाश चव्हाण आणि साहेब देशमुख या दोघांना डोक्‍यात आणि छातीत दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. यावेळी दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली. 

परळीत तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. गेवराईत तहसिल कार्यालय बंद करण्यासाठी गेल्यानंतर राम सवासे व मुन्ना मोटे या दोघांनी कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. नेकनूर, मुर्शदपूर, केज, दिंद्रूड या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले. केज, माजलगाव, अंबाजोगाई व बीड शहरातही दगडफेकीच्या घटना घडल्या. नांदूरघाट (ता. केज) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. बससह खासगी वाहतूक बंद होती. व्यापारीपठा, आठवडी बाजार बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. तालुक्‍यांतील शहरांसह सर्कलच्या गावांमध्येही बंद पाळण्यात आला. फेऱ्या काढून बंदचे आवाहन करण्यात आले. तर, जागोजाग काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिरुर कासार येथे तहसिल कार्यालयावर मोर्चा निघाला. दरम्यान, व्यापारपेठ आणि वाहतूक बंद असल्याने मंगळवारी जिल्ह्यात अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख