राहुल रेखावार : अभ्यासू विद्यार्थी ते डॅशिंग आयएएस अधिकारी  - Beed Collector Rahul Rekhawar: A studied student to the dashing IAS officer | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल रेखावार : अभ्यासू विद्यार्थी ते डॅशिंग आयएएस अधिकारी 

दत्ता देशमुख 
मंगळवार, 3 मार्च 2020

...

वडील अशोक रेखावार भौतिकशास्त्राचे प्राध्यापक (सेवानिवृत्त) तर आई शोभा रेखावार गृहीणी. दोन मोठ्या बहिणींपैकी निता या अभियांत्रिकीतल्या पदव्युत्तर पदवी (एम. ई. कॉम्प्युटर) व अमिता एमबीए आहेत. अशा उच्चशिक्षीत कुटूंबातील राहूल रेखावर देखील अभ्यासात हुशार होते, शालेय जीवनापासूनच त्यांना विविध परीक्षांची आवड होती. नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेतून त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर वडिलांनी त्यांच्यातील आत्मविश्वास अधिकच वृद्धींगत केला. 

10 वी व 12 वीत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या राहूल रेखावर यांनी प्रतिथयश बिट्‌स पिलानी या संस्थेतून इलेक्‍ट्रीकल अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स या विषयातून अभियांत्रिकीची डिस्टींक्‍शनमधून पदवी मिळविली. यानंतर नोकरी करतानाच आपण व्यापक सामाजिक काम करु शकतो का? हे स्वनिरीक्षण करण्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थेतही काम करत रात्रशाळा चालविली.

यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) घेण्यात येणाऱ्या आयएएस (भारतीय प्रशासन सेवा) परीक्षाची तयारी केली. तीन वर्षांच्या तयारीनंतर 2010 मध्ये त्यांना युपीएससीच्या परीक्षेत 15 वा रॅंक मिळाला आणि ते आयएएस झाले.चेहऱ्यावर इनोसंट आणि मनाने मृदू असलेले राहूल रेखावर कर्तव्यकठोर देखील आहेत. आयएएस झाल्यानंतर प्रथमच हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव हा त्यांच्या कर्तव्यकठोरपणामुळेच. परिस्थिती अनुकूल असली तरी त्यांनी गाठलेले यशाचे टप्पे आणि आत्मनिरिक्षणासाठी त्यांनी सामाजिक संस्थेत रात्रपाळीचे केलेले काम या दोन बाबी खऱ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणादायी आहेत. 
 

शैक्षणिक करिअरमध्येही कायम टॉपच
राहूल रेखावर शाळांमध्ये चित्रकला, सामान्यज्ञान परीक्षा, वक्तृत्व स्पर्धांत भाग घेत. नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. त्यावेळी कुटूंबियांनाही त्यांच्यातील प्रतिभेची जाणिव झाली. दहावी बोर्ड परीक्षेत ९१ टक्के आणि १२वी विज्ञान परीक्षेत ९६.३३ टक्के गुणांसह राज्यात दहावा आणि नांदेड बोर्डात त्यांनी दुसरा क्रमांक मिळविला.

देशातील अव्वल असलेल्या संस्थांपैकी राजस्थानमधील बिट्स पिलानी येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळविली. त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात दोन महिने परिविक्षाधिन कालावधीही पूर्ण केला. तसेच, त्यांना बंगळुरु येथील आयआयटी (इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स) मध्ये यंग इंजिनीअर फेलोशिप प्रोग्राम पूर्ण करता आला. मद्रास येथील आयआयटीमध्ये झालेल्या हार्डवेअर डिझाई कॉन्टेस्टमध्ये त्यांना पहिले पारितोषिक मिळाले. बिट्स पिलानी मध्ये झालेल्या खुल्या हार्डवेअर कॉन्टेस्टमध्येही त्यांनी पहिले पारितोषिक पटकावले.

म्हणून घेतली अभियांत्रिकीची पदवी
नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेतील यशानंतर कुटुंबिय आणि स्वत: राहूल रेखावर यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरविले होते. त्यामुळे १२ वी नंतर कला शाखेतून पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे त्यांना वाटत होते. मात्र, जर अपयश आले तर हातात दुसरा पर्याय असावा म्हणून अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा, असा सल्ला वडिल अशोक रेखावार यांनी दिला. त्यांनी बिट्स पिलानी मधून इलेक्ट्रीकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात (बी. ई. हॉनर्स) अभियांत्रिकीची पदवी मिळविली.

आत्मनिरीक्षणासाठी सामाजिक संस्थेत काम; रात्रशाळाही चालविली
अभियांत्रिकी पदवीनंतर युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली जवळ पडावी म्हणून त्यांनी नोयडातील एस. टी. मायक्रोईलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत डिझाईन इंजिनीअरची एक वर्षे दहा महिने नोकरी केली. परंतु, प्रशासकीय सेवेत जाऊन सामाजिक बदल घडविण्याची इच्छा होती. आपण खरोखरच समाजासाठी झोकून देऊन काम करु शकतो का? याचे आत्मनिरीक्षण करण्यासाठी राहूल रेखावर यांनी असोसिएशन फॉर इंडिया डेव्हलोपमेंट या सामाजिक संस्थेत काम सुरु केले. या संस्थेत रात्री आणि सुटीच्या दिवशी ते काम करत. त्याकाळी त्यांनी कामगार, मजूरांसाठी रात्रशाळा सुरु केली. त्यावेळीच आपण सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात काम करु शकतो असा त्यांना विश्वास पटला.

म्हणून आयएसच व्हायचे होते
समाजात व्यापक बदल, समस्यांवर ठोस उपाय, सामाजिक समस्या सोडवायच्या असतील तर एक तर ताकदवान नेता, मोठा समाजसेवक किंवा प्रशासनात बडा अधिकारी झाले तरच हे सर्व शक्य होते. परिस्थितीनुरुप इतर दोन बाबी शक्य नसल्याने अधिकारी होणे हाच पर्याय होता. त्यामुळे त्यांनी हा मार्ग स्विकारला.

आणि तिसऱ्यावेळी देशात १५ वा रँक
ऑक्टोबर २००६ मध्ये नोकरी सोडून त्यांनी दिल्ली गाठली आणि युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. २००७ मध्ये परीक्षेत त्यांना अपयश आले. पण, २००८ मध्ये त्यांना युनिअन टेरीटरीमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळाले. मात्र, त्यांना आयएएसच व्हायचे असल्याने त्यांनी ते स्विकारले नाही. २००९ ला त्यांनी परीक्षाच दिली नाही. २००१० च्या परीक्षेनंतर मात्र त्यांना देशात १५ वी रँक मिळाली.

कर्तव्यकठोरपणामुळे समितीची थाप; झेडपीत अविश्वास
२०१२ साली भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या राहूल रेखावर यांना प्रथमच फेब्रुवारी २०१५ मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा स्वतंत्र कार्यकारी पदावर सेवेची संधी भेटली. परंतु, याच काळात अचानक पंचायत राज समितीचा हिंगोली दौरा निश्चित झाला. पंधरा दिवसांचा वेळ हाती असतानाही श्री. रेखावर यांनी प्रशासन कामाला लावले आणि रात्रीचा दिवस करुन सर्व कामाचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला. समितीनेही या अहवालाचे कौतुक केले. मात्र, या अहवालातून अनेक अनियमित चव्हाट्यावर आल्या. यामुळे अनेकांचे काळेबेरे उघडे पडले आणि त्यावर कारवाया प्रस्तावित झाल्या. परंतु, यामुळे बिथरलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो संमत केला. त्यांचा सीईओ म्हणून सहा महिनेच काम करता आले परंतु त्यातून त्यांना खुप काही शिकता आले.

जबाबदारी आणि ओझं यातला फरक ओळखा
आपल्यावरील जबाबदारी आणि ओझं यातला फरक लक्षात आला तर कंटाळा येत नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी यश मिळविणाऱ्यांबरोबरच ज्यांनी दोन - तीन अॅटेम्प्ट दिले अशा उमेदवारांकडून मार्गदर्शन घ्यावे. यशस्वी होण्यासाठी १२ - १४ तास अभ्यास करणे प्रत्येकासाठी शक्य नसतं. त्यामुळे सुरुवातील सहा - सात तास नंतर आठ नऊ तास असा हळुहळु अभ्यासाचा वेळ वाढवावा. प्रशासकीय सेवेकडे केवळ करिअर व क्रेझ म्हणून पाहू नये. या परीक्षेत केवळ अभ्यास आणि हुशारी असून भागत नाही तर जबाबदारी पेलण्याची क्षमताही पाहीली जाते. त्यामुळे परिपूर्ण असावे लागते. त्या सर्व क्षमतांची पडताळणी करुन उमेदवारांनी निर्णय घ्यावा, असा सल्ला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना राहूल रेखावार देतात.

असा झाला करिअरचा प्रवास 

- १९९९ : नॅशनल टॅलेंट परीक्षेतून शिष्यवृत्ती.
- १९९९ : दहावी बोर्ड परीक्षेत ९१ टक्के गुण.
- २००१ : १२ वी बोर्ड परीक्षेत ९६.३३ टक्के गुणांसह राज्यातून दहावे, बोर्डातून दुसरे.
- जानेवारी २००५ ते ऑक्टोबर २००६ : एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स कंपनीत डिझाईन  इंजिनीअर.
- २००७ ते २०१० : युपीएससी परीक्षेची तयारी.
- २००८ : युनिअन टेरिटरीमध्ये निवड. (नोकरी केली नाही)
- २०१० : युपीएससी (भारतीय प्रशासन सेवा) परीक्षेत १५ वा रँक.
- ऑगस्ट २०१२ ते ऑगस्ट २०१३ : सहाय्यक जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग.
- ऑगस्ट २०१३ ते फेब्रवारी २०१४ : सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी इटापल्ली, गडचिरोली.
- मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१५ : सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, नागपूर.
- फेब्रुवारी २०१५ ते जुलै २०१५ : मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंगोली.
- जुलै २०१५ ते एप्रिल २०१८ : आयुक्त, परभणी महानगर पालिका.
- एप्रिल २०१८ ते जुलै २०१९ : जिल्हाधिकारी धुळे.
- जुलै २०१९ ते फेब्रवारी २०१० : सहाय्यक संचालक, महावितरण औरंगाबाद.
- फेब्रुवारी २०२० पासून : जिल्हाधिकारी बीड.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख