हो... स्वत: सहाय्यक आयुक्तांनी वस्तरा कैची हाती घेतली आणि वेडसर निराधारांची दाढी कटींग केली

सध्या लॉकडाऊनमुळे हेअर सलुन बंद आहेत. त्यातही कोणी कारागिर उपलब्ध झालाच तर एकाच्या दाढी कटींगसाठी चारशे रुपये मागत असल्याने मग डॉ. सचिन मडावी यांनीच हातात वस्तरा आणि कैची घेऊन वेडसर व निराधारांची दाढी कटींग केली.
beed assistant commissioner shaves beard of beggars
beed assistant commissioner shaves beard of beggars

बीड : सध्या लॉकडाऊनच्या काळात निराधार - निराश्रीत, हातावर पोट असणाऱ्यांसाठी अनेकांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. पण, अशा निराधार आणि निराश्रीतांची दाढी - कटींग खुद्द सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केल्याची घटना घडली आहे. डॉ. सचिन मडावी यांनी हातात वस्तरा व कैची घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या दहा वेडसर आणि निराश्रीतांच्या केसांची खुद्द सफसाई केली.  

एरव्हीच्या गर्दीत वेडसर आणि निराश्रीतांना हॉटेलचालक, वाटसरु घास भरवितात. त्यांच्या काही बाबी गर्दीत झाकूनही जातात. परंतु, लॉकडाऊन झाले आणि सर्वांनीच आपले शटर डाऊन केले. लोकही घरात बसले. पण, या वेडसर आणि निराश्रीतांनी खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. परंतु, लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहूल रेखावार यांनी या वेडसर आणि निराश्रीतांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था समाजकल्याण विभाग करेल असे आदेश दिले. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके यांनी पथके तयार केली आणि रस्ते व मंदीरांसमोरील वेडसर व निराश्रितांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले. या काळात ७० लोकांना निवारा कक्षात दाखल करुन घेऊन त्यांची जेवणाची व्यवस्था केली. तर, परळी येथील वैद्यनाथ मंदीर परिसरातील ३१ लोकांची घाटनांदूर येथील वृद्धाश्रमात राहण्या - खाण्याची सोय करण्यात आली. 

दरम्यान, सुरुवातीलाच या लोकांना आंघोळ, त्यांची दाढी कटींग करुन पुन्हा त्यांची राहणे व खाण्याची सोय करण्यात येते. लॉकडाऊन असल्याने दाढी कटींगचेही दुकान बंद आहेत. त्यामुळे यासाठी कोणी उपलब्ध झालाच तर प्रतिमाणसी ४०० रुपये मागू लागला. मग, यावर मार्ग म्हणून डॉ. सचिन मडावी यांनी सातशे रुपयांची मशिन घेतली आणि वेडसर व निराश्रीतांची स्वत:च दाढी - कटींग केली. शनिवारी त्यांनी दहा लोकांची दाढी कटींग केली.

दरम्यान, डॉ. सचिन मडावी यांच्या कामाचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही कौतुक केले. श्री. मुंडे यांनी त्यांच्या सोशल प्लॅटफार्मवर कौतुकाच्या पोस्टही केल्या.


व्यक्तीमत्वही अवलिया; सोडल्या पाच नोकऱ्या
दरम्यान, सध्या सामाजिक न्याय विभागात कार्यरत असलेले डॉ. सचिन मडावी यांचे व्यक्तीमत्वही अविलयाच आहे. त्यांनी आतापर्यंत बड्या हुद्द्याच्या पाच नोकऱ्या सोडल्या आहेत. आयुर्वेद शाखेतील पदवीधर डॉ. सचिन मडावी यांच्या कुटूंबात ११ डॉक्टर आहेत. 

दरम्यान, २००९ साली सर्वात प्रथम त्यांनी उमरगा येथे वैद्यकीय अधिकारी पदावर नोकरी सुरु केली. मात्र, काही तरी वेगळे करावे म्हणून त्यांनी परीक्षांच्या माध्यमातून तयारी सुरु केली आणि दिल्लीत इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) मध्ये अधिकारी म्हणून नोकरीला लागले. त्याच काळात परीक्षेच्या माध्यमातून ते सेल्स टॅक्स ऑफिसर पदाची परीक्षा पास झाले आणि आयबीतील नोकरी सोडून त्यांनी हे पद स्विकारले. 

परंतु, इथे म्हणजे बड्या लोकांचे कर भरुन घेण्यापुढे सामाजिक टच काहीच नव्हता. यानंतर त्यांची महसूल विभागात अन्न पुरवठा निरीक्षक पदाला गवसणी घातली. पण, इथेही फक्त महसूल एके महसूल असेच होते. सामान्यांशी टच असावा, त्यांच्यासाठी काम करता यावे म्हणून सामाजिक न्याय विभागात २०१४ पासून रुजू झाल्याचे डॉ. मडावी म्हणाले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com