माणसे संपतील, पण काँग्रेसची विचारधारा संपणार नाही : बसवराज पाटील  

.
Basavraj-Patil
Basavraj-Patil

उमरगा  : काँग्रेस पक्षाने पन्नास वर्षात अनेक चढ - उतार पाहिले आहेत. आताची स्थिती काही नवीन नाही. काँग्रेस पक्ष संपल्याची वल्गना कांही लोक करताहेत मात्र माणसं संपतील, परिस्थिती बदलेल पण पक्षाची विचारधारा संपणार नाही. भिंती सुध्दा काँग्रेसचे विचार सांगतील. कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीत पक्षाचे विचार जोपासण्यासाठी सक्रिय व्हावे,  असा आत्मविश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष, आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्षपदी आमदार पाटील यांची निवड झाल्याबद्दल उमरगा - लोहारा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने गुरुवारी  शिवाजी चौकात आयोजीत सत्कार समारंभात आमदार पाटील बोलत होते. काँगेस समितीचे तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे अध्यक्षस्थानी होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले की, एकनिष्ठेने काम करत सामाजिक भावनेतून काम केल्याने तालुका युवक काँग्रेस ते प्रदेश समितीच्या कार्याध्यक्षपदाची संधी मिळाली आहे, त्यात उमरगेकरांचे प्रेम, योगदान मोलाचे आहे. तालुका काँग्रेसच्या विचाराचा प्रतीक आहे, पण आता संघर्षाचा काळ असल्याने कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. चांगल्या कामासाठी आव्हान पेलण्यासाठी आपण तत्परतेने काम करणार आहोत त्यात पक्षाच्या विविध घटकातील कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे बळ मिळणे आवश्यक आहे. दहा वर्षात उमरगा -लोहारा तालुक्याचे मोठे नुकसान झाल्याची खंत व्यक्त करुन केंद्र व राज्यात त्यांची सत्ता असताना तालुक्याला विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. 

विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर आली आहे, कार्यकर्त्यांनी उणे - दुणे काढण्यापेक्षा तालुक्याचा आमदार काँग्रेसचाच होण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन करून भविष्यात राज्यात उमरगा तालुका मॉडेल करण्याची जबाबदारी माझी राहिल अशी हमी दिली.

 या वेळी मुरूम कृषी बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष रामकृष्णपंत खरोसेकर, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, पंचायत समितीचे सभापती राजासाहेब पाटील (उमरगा), नमिती पाटील (लोहारा), नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे (उमरगा), अनिता अंबर (मुरुम), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, विठ्ठलराव बदोले, मदन पाटील, किसन कांबळे, बाबुराव राठोड, बसवराज कारभारी, अॅड. व्ही.एस. आळंगे, हेमलता रणखांब, सुवर्णा भालेराव,संगीताताई कडगंचे, शालिनी जिवनगे, नानाराव भोसले, जालींदर कोकणे, बाबुराव शिंदे, संजय सरवदे आदींची उपस्थिती होती.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com