नारायणगौडांच्या "जय महाराष्ट्र'ला बसवराज पाटील यांचा पाठिंबा

................
नारायणगौडांच्या "जय महाराष्ट्र'ला बसवराज पाटील यांचा पाठिंबा

बंगळूर : नगरप्रशासन मंत्री के. सी. नारायणगौडा यांनी " जय महाराष्ट्र, जय शिवाजी' म्हटले आहे. त्यात चुकीचे काय आहे? ज्यावेळी बंगळूरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, त्यावेळी बंगळूरमधील कन्नड संघटनांचे म्होरके कोठे होते, असा सवाल करत माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार बसवनगौड पाटील-यत्नाळ यांनी कन्नड संघटनांची कानउघडणी केली. चित्रदुर्ग येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 

आमदार पाटील-यत्नाळ यांनी, कन्नड संघटनांच्या नावावर राजकारण करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना भूमाफिया संबोधत राज्यात सुरु असणाऱ्या लुटीवर प्रकाश टाकला आहे. मंत्री नारायणगौडा यांनी "जय महाराष्ट्र' म्हटले, यात काय चुकीचे आहे? त्यांनी देशाच्या एका भागाचा जयजयकार केला आहे. त्यांनी काही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या नाहीत. पाकिस्तानची घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात राज्यातील कन्नड संघटनांचे नेते गप्प असतात. त्याविरोधात त्यांनी आवाज का उठविला नाही? हुबळी आणि बंगळूरमध्ये पाकिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी हे भूमाफिया कोठे गेले होते, असा सवालही त्यांनी केला. 

मंड्या जिल्ह्यातील कृष्णराजपेठे येथे झालेल्या एकात्मता कार्यक्रमात गुरुवारी (ता. 27) मंत्री नारायणगौडा यांनी "जय महाराष्ट्र' अशी घोषणा दिली होती. मात्र, त्याचा बाऊ करत काही कन्नड संघटना आणि स्वयंघोषित नेत्यांनी मंत्र्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या स्वयंघोषित नेत्यांना भूमाफिया संबोधत आमदार पाटील-यत्नाळ यांनी मंत्री नारायणगौडा यांचे समर्थन केले आहे. तसेच देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी कन्नड संघटना कुठे कमी पडत आहेत, हे दाखवून दिले आहे. 

पाकिस्तान मित्र आहे का? 
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर एकाही कन्नड संघटनेने किंवा स्वयंघोषित नेत्याने त्यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. पण, मंत्र्यांनी आपल्याच देशातील एका शेजारील राज्याचे गोडवे गायल्याने कन्नडिगांना पोटशूळ उठला. या स्वयंघोषित नेत्यांना पाकिस्तान मित्र आणि महाराष्ट्र शत्रू ठरला आहे का, असा प्रश्‍न करत आमदार पाटील-यत्नाळ यांनी अशा स्वयंघोषित नेत्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com