चिंचवड विधानसभेसाठी बारणे व जगताप यांची प्रतिष्ठा पणाला

चिंचवड विधानसभेसाठी बारणे व जगताप यांची प्रतिष्ठा पणाला

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी चिंचवड विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. भाजपचे शहराचे कारभारी व विद्यमान आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि त्यांचे कट्टर राजकीय शत्रू शिवसेनेचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या प्रतिष्ठेची ती लढाई आहे. कारण होमपीच असलेली ही जागा जिंकली, तर या दोघांचेही त्यांच्या पक्षात वजन आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्याची तयारी त्यांनी आतापासून सुरू केली आहे. राज्य सरकारमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांची एकीकडे जय्यत तयारी सुरू असताना चिंचवडमध्ये राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे. कुणी तगडा उमेदवार देता का, तगडा उमेदवार? अशी विचारणा करण्याची वेळ त्यांच्यावर तूर्त आली आहे. 

2009 पर्यंत चिंचवड मतदारसंघच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड हे हवेली विधानसभा आणि लोकसभेला बारामतीत मोडत होते. 2009 ला हवेलीचे विभाजन होऊन पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले. तेव्हापासून ताकद असूनही या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक झालेली नाही. दुसरीकडे त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्या वर्षापर्यंत राष्ट्रवादी अबाधित होती. चिंचवडचे 2009 ला अपक्ष म्हणून पहिले व नंतर 2014 ला दुसरे आमदारही जगतापच झाले. 2019 ला सुद्धा ते "हॅटट्रिक'च्या तयारीत आहेत. त्यांचेच पारडे तूर्त जड आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेचे पिंपरी महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे नाव यांचे नाव घेतले जात आहे. गतवेळीही त्यांनी ही निवडणूक लढविली होती. भाजप, शिवसेनेची तयारी अशी जोरदार सुरू असताना राष्ट्रवादीच्या गोटात, मात्र शांतता आहे. त्यांचे पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र,ते लोकसभेला इच्छुक आहेत. त्यामुळे भाऊंना तुल्यबळ असा तगडा उमेदवार तूर्त त्यांच्याकडे दिसत नाही. 

भाऊंना पुरून उरेल अशा दादा उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे. त्यामुळे कोणी तुल्यबळ उमेदवार देता का अशी विचारणा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विधानसभेला दीड वर्षे बाकी आहे. मात्र, जर लोकसभेबरोबर ही निवडणूकही घ्यायचे ठरले, तर वर्षातच ती होऊ शकते. तसे वारे सध्या वाहते आहे. त्यामुळे विधानसभेचीही तयारी पक्षाने आतापासून करावी व इच्छुकांना कामाला लावावे,अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. 

भाऊ लोकसभेला मावळमधून लढले, तरी त्यांना होमपीच असलेल्या चिंचवड विधानसभेची जागा कुठल्याही परिस्थितीत टिकवावीच लागणार आहे. त्यामुळेच त्यांचे पक्षातील वजन आणखी वाढणार आहे. अशीच काहीशी स्थिती अप्पांची आहे. भाऊंप्रमाणे अप्पांचे सुद्धा चिंचवड होमपीच आहे. खासदार होण्यापूर्वी ते चिंचवडमधीलच प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून येत होते. ते पुन्हा खासदार झाले, तरी चिंचवडमधून त्यांना पक्षाचा आमदार करण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे. त्यातून त्यांची पक्षातील प्रतिष्ठा वाढणार आहे. अशारीतीने चिंचवडला प्रत्यक्ष उमेदवार नसले, तरी अप्पा आणि भाऊंची प्रतिष्ठा पणास लागणार आहे. कारण लोकसभेला एक निकाल,आला, तरी विधानसभेला दुसरा निकाल चिंचवड नोंदविते, हा इतिहास आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com