अजितदादांना भेटायची इच्छा...पण काय बोलले हे कोणाला सांगू नका, अशीही विनंती

...
baramati youth meet ajit pawar
baramati youth meet ajit pawar

सोमेश्वरनगर : अजित पवार यांच्या बहुचर्चित उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्याच्या पार्श्वभूमीवर आज बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक, सोमेश्वर कारखान्याचे आजी-माजी उपाध्यक्ष आदींनी आज अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनीही पवार यांची भेट घेतल्याचे समजते. अजित पवारांना भेटण्यात युवकांचा भरणा अधिक आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकविले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत सामान्य लोकांसह राष्ट्रवादीच्या पक्षाच्या व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. शरद पवार हे बारामतीकरांचे आदरस्थान आहे तर अजित पवार यांच्याशी थेट संपर्क. अजित पवारांनीच विविध पदाधिकाऱ्यांना पदावर बसविले आहे. त्यामुळे अजित पवार यांना भेटावे तरी अडचण आणि न भेटावे तरी अडचण अशा भावनांच्या हिंदोळ्यावर बारामती झुलत आहे.

अशा पार्श्वभूमीवर मागील दोन दिवस मिनिटा मिनिटाला वेगवेगळी वृत्त येत असल्याने राष्ट्रवादीच्या युवकांनी व काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेण्याचे टाळले. मात्र, काल अजित पवार यांची त्यांच्या कुटुंबियांनी आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांनी समजूत घालूनही भूमिका बदलली नाही. काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी भूमिकेवर ठाम असल्याचे दाखवून दिले. यानंतर आज ते मंत्रालयात पदभार स्वीकारण्यासाठी जाणार असल्याची माहिती पसरली होती. ते पाहण्यासाठी बारामतीकडून अजित पवारांना भेटण्यासाठी मुंबईकडे ओघ सुरू झाला.

आज सकाळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची पवारांशी भेट झाली तेव्हा काही बारामतीकरांचे टीव्हीवर दर्शनही झाले आणि चर्चेला उधाण आले. आज सकाळी काहीजणांनी अजित पवार यांची निवासस्थानी तर काहींनी मंत्रालयात पवार यांची भेट घेतली.
यामध्ये सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे यांच्यासह एकूण पाच संचालक होते.

याशिवाय बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी होते. तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचे पती व काटेवाडीचे काही युवकही उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बावळे हेही आज पवारांच्या भेटीसाठी ताटकळले होते. त्यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारीही अजित पवार यांना भेटल्याचे समजते.
याबाबत राहुल वाबळे यांनी, अजित पवारांना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले मात्र अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे म्हणाले, पवार कुटुंबियांतील वाद आमच्यासाठी अत्यंत दुःखद आहे. साहेबही आमचे आदरस्थान आहेत आणि दादाही आमचे नेते आहेत. त्यामुळे फक्त दादा पदभार स्वीकारणार कळल्यामुळे भेटण्यासाठी आलो.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com