Baramati News NCP Chief Sharad Pawar Pays Tribute to Arun Jaitley | Sarkarnama

बुद्धीमान अर्थतज्ज्ञ, उत्तम संसदपटू गमावला : शरद पवार यांची जेटलींना आदरांजली

मिलिंद संगई
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

केवळ संसदेतच नाही तर कोर्ट असो वा क्रिकेट अशा सर्व क्षेत्रात अरुण जेटलींनीअष्टपैलू गुणांची छाप उमटवली. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली. आमचे राजकीय विचार जरी विरोधाचे असले तरी वैयक्तिक पातळीवर सौहार्दाचे संबंध राहिले - शरद पवार

बारामती शहर : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने संपूर्ण देशाने एक निष्णात विधीज्ञ, अभ्यासू वाक्पटू, बुध्दीमान अर्थतज्ज्ञ, उत्तम संसदपटू गमावला, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली संवेदना प्रकट केली. 

''केवळ संसदेतच नाही तर कोर्ट असो वा क्रिकेट अशा सर्व क्षेत्रात त्यांनी अष्टपैलू गुणांची छाप उमटवली. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली. आमचे राजकीय विचार जरी विरोधाचे असले तरी वैयक्तिक पातळीवर सौहार्दाचे संबंध राहिले, अर्थमंत्री झाल्यावर बारामती भेटीचे निमंत्रण त्यांनी अगत्याने स्विकारले होते. गोविंदबागेत ते राहिले, बारामतीच्या विकास मॉडेलची त्यांनी दिलखुलास प्रशंसा केली, त्यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण आजही बारामतीकरांच्या स्मरणात आहे,'' असे सांगत पवार यांना 
जेटलींच्या बारामती भेटीच्या आठवणीही जागविल्या. 

बारामती सारखी शंभर शहरे जर निर्माण झाली तर देशाचा विकास वेगाने होईल, हे त्यांचे वाक्य आजही माझ्या स्मरणात असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. बारामतीसाठी त्यांनी जी सद्भावना व्यक्त केली ती आम्हा लोकांच्या मनात कायमची राहिल, आज ते नाहीत त्या मुळे एका चांगल्या मित्राला, हितचिंतकाला तसेच संसदेतील एका ज्येष्ठ सहका-याला कायमचे मुकलो आहोत, अशी श्रध्दांजली शरद पवार यांनी अर्पण केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख