baramati loksabha | Sarkarnama

लोकसभा बारामतीतूनच लढणार :महादेव जानकर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 एप्रिल 2017

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी आग्रही असून 15 वर्षे आघाडी सरकारला मतदान देणाऱ्या या समाज बांधवांना मला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार नाही. मात्र, मी राज्य शासनाच्या माध्यमातून आरक्षणाचा विषय हाताळत असून आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काही दिवसांपूर्वी रासपची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्याची नव्याने घोषणा केली जाईल. नव्या कार्यकारिणीत काम करणाऱ्यांनाच संधी मिळेल. - महादेव जानकर

सातारा : आगामी लोकसभा निवडणूक बारामती मतदारसंघातूनच लढविण्याचे संकेत पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सातारा जिल्हा दौऱ्यात दिले. राष्ट्रीय समाज पक्ष यापुढे ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री जानकर म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष
ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. कोणाचा चमचा म्हणून काम न करता स्वतंत्र ओळख असलेला पक्ष निर्माण करणार आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असून दुधाचे दर टप्प्याटप्याने सहा रुपयांनी वाढविले जातील. राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात व येणाऱ्या गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 20 ते 25 जागा लढवेल. यामध्ये मी स्वतः: लोकसभेसाठी बारामती मतदारसंघातूनच निवडणूक लढवून केंद्रात मंत्री म्हणून काम करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात ओबीसी समाज एकत्र करून वेळ पडल्यास या समाजाचे स्वतः: नेतृत्व करणार आहे. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी काहीही काम केलेले नाही. त्यामुळे जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करावी, अशी सूचना त्यांनी केली.

माण तालुक्‍यातील रासपचे माजी पदाधिकारी शेखर गोरे राष्ट्रवादीत गेले असून त्यांच्या जागी जिल्हा नियोजन मंडळात कऱ्हाडमधील पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाईल, असे सांगून श्री. जानकर म्हणाले, महाराष्ट्रास दिल्ली, गुजरात या ठिकाणी जाऊन निवडणुका लढून रासप पक्ष वाढीवर भर देणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख