आढळरावांचे गिरीश बापट झाले सारथी सोबत युतीचे आमदार महारथी!

आढळरावांचे गिरीश बापट झाले सारथी सोबत युतीचे आमदार महारथी!

शिक्रापूर :  शिवसेनेचे खासदार आढळरावांसाठी भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट आज चक्क सारथी झाले आणि मागे रथात आपलेच चार आमदार उभे करुन आढळरावांचे सगळ्यांना एकमुखी पाठीराखे केले. वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथे हे राजकीय-मनोहारी दृष्य उपस्थितांना अनुभवायला आले आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या युतीचे गोडवे याच मान्यवरांच्या तोंडून तमाम उपस्थितांना ऐकायला मिळाले.  

तब्बल गेली साडेचार वर्षे एकमेकांवर तोंडसुख घेणारे भाजपा-शिवसेनेचे नेते-पधादिकारी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीच्या निमित्ताने एकत्र आले आणि एकमेकांना राजकीय बळ देण्यासाठी चक्क एकमकांचे पाठीराखे झाल्याचा अनुभव मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला आज आला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३०व्या बलीदान स्मरण दिनाचे निमित्ताने आज वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक लोटले होते. शासकीय पुजा, शासकीय मानवंदना, समाधीवर पुष्पवृष्टी असे सगळेच विधीवत सोपस्कर पार पडत असताना पुरंदर ते वढु बुद्रुक असा पालखी सोहळाही याच दरम्यान पार पडत होता. याच पालखीच्या रथाचे सारथ्य आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

हे सारथ्य करताना बापटांनी आपल्या सोबत शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना सोबत पुढे बसवून घेतले. आढळराव-पाटील तुम्हाला चौकार मारायचाय ना मग या आमचे सोबत म्हणत सोबतीला आढळरावांना बसविले आणि पालखी सोबत चाललेले भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे, महेश लांडगे, जगदीश मुळीक व शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांना रथात मागे उभे रहायला सांगून काही वेळ हा रथ पुढे नेला. 

महाराष्ट्रभरातून आज मोठ्या संख्येने भाविक वढु बुद्रुक येथे दाखल झालेले आहेत. कितीही नाही म्हटले तरी अशा कुठल्याही कार्यक्रमांमध्ये राजकीय पदाधिका-यांची उपस्थिती आणि त्यांची वक्तव्ये याकडे सगळ्यांचे लक्ष असते. पर्यायाने शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव हे काय बोलतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असते. मात्र दोन्ही उमेदवारांनी काहीच राजकीय  टिकाटिपण्णी केली नसली तरी पालकमंत्री गिरीश बापट आणि त्यांच्या युतीच्या रथाची ही आजच्या कार्यक्रमाचे राजकीय आकर्षण ठरले हे नक्की! 

मताधिक्याची महेशदादा आणि माझ्यात स्पर्धा : पाचर्णे

युती म्हणजे आमची महायुतीच आहे. त्यामुळे महेशदादांनी भोसरीतून सर्वाधिक मताधिक्य देण्याची घोषणा केली असली तरी त्यांच्यापेक्षात मी जास्तच मताधिक्य खासदार आढळराव यांना देणार असल्याची माहिती यावेळी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com