Ban on Bulluck cart races will affect farmers | Sarkarnama

बैलगाडा शर्यत बंदीने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले- आमदार महेश लांडगे

ब्रह्मदेव चट्टे- सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 एप्रिल 2017

“तामिळनाडूतील जलीकट्टू स्पर्धेवर बंदी आणल्यानंतर तामिळनाडूतील प्रत्येकाने त्या विरोधात आवाज उठवला. त्यावेळी राजकारणी, अभिनेते, समाजकारणी, डाॅक्टर यांच्यासह तामिळनाडूतील सामान्य नागरिक रस्त्यांवर उतरला होता. परंतु, महाराष्ट्ररातील बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर शेतकऱ्याच्या पाठीशी कोणीच उभे राहिले नाही.- महेश लांडगे

मुंबई - ''न्यायालयाच्या आदेशाने बैलगाडा शर्यत बंदीने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. सरकारने एकाबाजूला गोवंश बंदी कायदा केला. परंतु, दुसरीकडे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली गेली. त्यामुळे  शेतकऱ्यांना बैलांना रस्त्यावर सोडावे लागेल,'' अशी भिती आमदार महेश लांडगे यांनी आज व्यक्त केली.

विधानसभेत प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० मध्ये सुधारणा विधेयकावरील चर्चेच्यावेळी  विधानसभेमध्ये बोलत होते. या चर्चेत आमदार अशिष शेलार, आमदार शरद सोनावणे, आमदार मंगलप्रसाद लोढा, आमदार चंद्रदीप नरके, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार राहूल कुल यांनी भाग घेतला.

या चर्चेत आमदार महेश लांडगे जास्तच भावूक झाले होते. ते म्हणाले, “शेतकरी बैलाला कधीच बैल म्हणत नाही. त्याला कधी राजा म्हणतो, कधी त्याला सर्जा म्हणतो. शेतकरी बैलाला कुटुंबातील सदस्य समजतो. बैलाला नंदीची उपमा दिली जाते. महादेवाच्या दर्शनाला जाताना पहिल्यांदा नंदीच्या पाया पडतात. गावात शेतकरी बैलाचा वाढदिवस आणि अंत्यविधीही परंपरेप्रमाणे मनोभावे करतो. हे लक्षात घेतले तर प्राणी मित्रांचे आरोप चुकीचे आहेत, हे सिद्ध होते."

बैलगाडा शर्यतीवर बंदीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडून गेले असल्याचा दावाही लांडगे यांनी केला. ते पुढे म्हणाले, “तामिळनाडूतील जलीकट्टू स्पर्धेवर बंदी आणल्यानंतर तामिळनाडूतील प्रत्येकाने त्या विरोधात आवाज उठवला. त्यावेळी राजकारणी, अभिनेते, समाजकारणी, डाॅक्टर यांच्यासह तामिळनाडूतील सामान्य नागरिक रस्त्यांवर उतरला होता. परंतु, महाराष्ट्ररातील बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर शेतकऱ्याच्या पाठीशी कोणीच उभे राहिले नाही."

''स्पर्धेवर बंदी आणली तर बैल कोणी बैल सांभाळणार नाही. मग गायींचे संवर्धनही होणार नाही. मग बैल संभाळून फायदे होणार नसेल तर हे विधेयक आणून फायदा काय होणार?" असा सवालही यावेळी आमदार महेश लांडगे यांनी विचारला. आमदार लांडगे यांनी यावेळी कायद्यात सुधारणा करण्याचे विधयेक आणल्यामुळे सरकारचे व मंत्री महादेव जानकर यांचे आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख