balu mama trust gave explanation about corona medicine and appeals do not spread rumours | Sarkarnama

मध्यरात्री बारा वाजता काळा चहा हळदीपूड टाकून पिल्याने कोरोना बरा होतो, अशी भाकणूक झालेली नाही!

संपत मोरे
बुधवार, 25 मार्च 2020

संत बाळूमामांचा भक्त परिवार संपुर्ण महाराष्ट्रात आहे. काही भक्त कोरोना बरे होण्याचा उपाय भाकणुकीत सांगितल्याचे मेसेज व्हायरल करत होते. 

पुणे : "संत बाळूमामा यांच्या नावाने कोणीही अफवा पसरवू नका. सरकार जे सांगत आहे ते ऐका. कोरोनावर कोणत्याही प्रकारचे औषध बाळू मामा यांच्या भाकणुकीत सांगितलेले नाही,"असा खुलासा आदमापूर (जि. कोल्हापूर) येथील संत बाळू मामा ट्रस्टचे मगदूम यांनी केला आहे.

मध्यरात्री बारा वाजता काळा चहा हळदीपूड टाकून पिल्याने कोरोना रोग बरा होतो, अशी भाकणूक आदमापूर येथील संत बाळूमामा यांच्या मंदिरात झाल्याची अफवा उठली आहे. ग्रामीण भागात ही अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. बाळू मामा यांच्यावर श्रद्धा असलेला मोठा वर्ग ग्रामीण महाराष्ट्रात आहे. या अफवेमुळे लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र त्याबाबत मगदूम यांनी खुलासा करत "अफवांवर विश्वास ठेवू नका," असे आवाहन केले आहे.

"संत बाळू मामा यांच्या मुर्तीच्या डोळ्यातून पाणी आले आहे. समाधी हलली आहे, "अशा अफवा उठल्या आहेत, मात्र तसे काही झालेले नाही. अशा चुकीच्या मेसेज वर कुणी विश्वास ठेवू नये. तसेच असे मेसेज पुढे पाठवू नये "असे आवाहन मगदूम यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख