राहुल गांधींनी खांद्यावर हात टाकला तेव्हाच बाळासाहेबांना अंदाज आला होता....

सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे, दोनदा राज्यमंत्री, चारदा कॅबिनेट मंत्री, कॉंग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी मंडळाचे कायम सदस्य, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ गटनेते आणि काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटविणारे बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली, त्या वेळी संगमनेरकरांना कोण अभिमान वाटला असणार...
rahul gandhi gives responsibility to balasaheb thorat
rahul gandhi gives responsibility to balasaheb thorat

नगर  ः शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या सरकारमध्ये कॉंग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. थोरात यांनी याआधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या काळात दोन वेळा राज्यमंत्री म्हणून आणि चार वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानिमित्त थोरात यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीची आणि त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची ते प्रतिनिधित्व करत असलेल्या संगमनेरकरांना आठवण झाली.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने विक्रमी बहुमत मिळविले होते. त्यामुळे नंतर लगेचच आलेल्या विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसच्या विजयाबाबत कोणालाही शंका नव्हती. संगमनेर मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते आणि स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब संतूजी थोरात निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. कॉंग्रेस मात्र माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्याची शक्‍यता होती. मात्र, या दोघांनाही टाळून कॉंग्रेसने परदेशस्थ असलेल्या मूळच्या पुणे जिल्ह्यातील शकुंतला थोरात यांना संगमनेरमध्ये उमेदवारी दिली.

त्यामुळे दुखावलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब थोरात यांना अपक्ष का होईना; पण निवडणूक लढविण्याची गळ घातली. थोरात यांनी त्यास नकार दिला. बाहेरच्या आणि पक्षाने लादलेल्या उमेदवार म्हणून शकुंतला थोरात यांचा प्रचार आम्ही करणार नाही, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले, तेव्हा पेच निर्माण झाला. या पेचातून मार्ग काढण्यासाठी एक नाव पुढे आले, ते ऍड. विजय भाऊसाहेब थोरात यांचे. त्यांनी अपक्ष उमेदवारी करावी, अशी गळ कार्यकर्त्यांनी घातली. तालुक्‍याच्या सहकार चळवळीत वडील भाऊसाहेब थोरात यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा तरुण वकील, एवढीच विजय थोरात यांची त्या वेळी ओळख. स्वतःचे गाव असलेल्या जोर्व्यात 1979मध्ये स्थापन केलेली अमृतवाहिनी सहकारी दूध संस्था, विडीकामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी केलेल्या आंदोलनामुळे 1980 मध्ये झालेला नऊ दिवसांचा तुरुंगवास आणि भंडारदरा धरणाच्या पाण्यासाठी सुरू केलेली चळवळ, एवढीच कामगिरी त्यांच्या नावावर होती. राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी ही कामगिरी तेवढी पुरेशी नसेलही कदाचित; पण कार्यकर्त्यांनी चंग बांधलाच... याच तरुणाला कॉंग्रेसच्या विरोधात उभे करायचे... आणि ऍड. विजय भाऊसाहेब थोरात 1985च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून 10 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले... बाळासाहेब थोरात या नेत्याचा राजकीय मंचावर जन्म झाला तो असा... त्यानंतर गेल्या सुमारे 35 वर्षांत केवळ कॉंग्रेसच्या नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात तेजाने चमकणारा प्रवरेचा तारा म्हणून थोरात यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे, दोनदा राज्यमंत्री, चारदा कॅबिनेट मंत्री, कॉंग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी मंडळाचे कायम सदस्य, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ गटनेते आणि काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटविणारे बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली, त्या वेळी संगमनेरकरांना कोण अभिमान वाटला असणार... 
संगमनेर तालुक्‍याच्या विकासासाठी प्रसंगी दोन पावले मागे जाण्याची तयारी ठेवत, पक्षांतर्गत विरोधक असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी कधी मिळतेजुळते घेत, कधी थेट द्वंद्व करत पक्षातील आपले स्थान थोरात यांनी बळकट केलेच; शिवाय राज्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्वही निर्माण केले. विशेष म्हणजे, आठ वेळा आमदार झालेले आणि पाटबंधारे, कृषी आणि महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद सांभाळूनही, गैरव्यवहार किंवा अनियमिततेचा कोणताही शिंतोडा थोरात यांनी अंगावर उडू दिला नाही. या काळात त्यांनी लातूर, उस्मानाबाद आणि अगदी राज्याच्या उपराजधानी असलेल्या नागपूरचेही पालकमंत्रिपद यशस्वीरीत्या सांभाळले. गुजरात विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेस उमेदवार निवड समितीचे प्रमुख म्हणून आणि हिमाचल प्रदेशात निरीक्षक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी पक्षासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

लोकसभा निवडणुकीतील संगमनेर येथील प्रचारसभेनंतर राहुल गांधी यांनी थोरात यांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेले छायाचित्र स्वतः ट्‌वीट केले तेव्हा, आधीच पक्षातील स्थान बळकट झालेल्या थोरात यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा अंदाज जाणकारांना आला असावा. ते गांधी यांच्या निकटच्या वर्तुळात दाखल झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. आपल्याच मतदारसंघात आणि जिल्ह्यातही विविध ठिकाणी प्रचारसभा घेऊन राज्यातील प्रचाराचे नियोजन थोरात यांनी असे केले, की लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या पक्षाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने 44 जागा जिंकून दिल्या. कॉंग्रेस आणि "राष्ट्रवादी'च्या मदतीने शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याचे निश्‍चित झाले, तेव्हाच बाळासाहेब थोरात यांच्याकडे नव्या मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी असेल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती.

संगमनेर मतदारसंघाचा विकास
बाळासाहेब थोरात यांनी शिक्षण संपवून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला, त्या वेळी प्रवरा नदीवर निळवंडे येथे धरण बांधायला मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. पुढे धरणाला यथावकाश मंजुरी मिळाली; पण हे धरण पूर्ण करण्यासाठी आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मधुकर पिचड यांच्यासह थोरात यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. धरणातून थेट संगमनेर शहरासाठी जलवाहिनी टाकून शहराचा पाणीप्रश्‍न थोरात यांनी कायमचा मिटवून टाकला आहे. आता निळवंडे कालव्यांचे पाणी संगमनेरच्या उत्तरेकडील, कायम अवर्षणग्रस्त भागात पोचविण्यासाठी ते निश्‍चित प्रयत्न करतील, अशी आशा त्या भागातील लोकांना आहे. जोर्वे येथे अमृतवाहिनी सहकारी दूधउत्पादक संस्था थोरात यांनी पहिल्यांदा आमदार होण्याच्या पाच वर्षे आधी, म्हणजे 1980मध्ये स्थापन केली होती. पुढे संगमनेर तालुका सहकारी दूध संघ आणि थोरात सहकारी साखर कारखान्यासह सर्व सहकारी संस्थांवर थोरातांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्या माध्यमातून संगमनेरचे "राजहंस' दूध आणि दुग्धोत्पादने देशभरातील बाजार व्यापून आहेत. कृषी, अभियांत्रिकी आणि दंतवैद्यकसह विविध महाविद्यालयांचे जाळे संगमनेरभोवती विणले. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दंडकारण्य अभियानातून वृक्षसंवर्धनाचा नवा अध्याय संगमनेर तालुक्‍यात लिहिला जात आहे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com