माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तावरे

माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तावरे

माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तावरे यांची आज बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी तानाजी तात्यासाहेब कोकरे यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. तावरे व उपाध्यक्ष श्री. कोकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पवार यांनी वरील दोन्ही अनुभवी चेहऱ्यांना संधी देत आपले "माळेगाव'वर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. विशेषतः बाळासाहेब तावरे यांनी अध्यक्षपदावर टप्पापद्धतीने सुमारे 14 वर्षे असे सर्वाधिक काळ काम केल्याची नोंद आहे. 

माळेगाव कारखान्याची 25 फेब्रुवारी रोजी पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. या निवडणूकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनलचा विजय झाला होता. 21 पैकी 17 जागा जिंकत पवार यांनी "माळेगाव'ची सत्ता खेचून आणली. मावळते अध्यक्ष व पवारांचे विरोधक रंजन तावरे, संचालक चंद्रराव तावरे यांना या निवडणुकीत स्वतःसह चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सभागृहात विरोधक म्हणून पुढे येणारे हे दोन्ही अनुभवी चेहरे, कारखाना विस्तारिकरणातील राहिलेल्या काही त्रुटी, राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ केलेले काम आदी बाबी विचारात घेत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यातर्फे बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे यांची नावे सुचविले. त्यानुसार आज (रविवारी) निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज हिरे यांच्याकडे अध्यक्षपदासाठी बाळासाहेब तावरे, तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी कोकरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. 

दरम्यान, बाळासाहेब तावरे म्हणाले, ""काटकसरीबरोबरच विस्तारिकरणातील तृटी भरून काढत दर्जदार साखर उत्पादन करणे, तोटा कमी करून उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणे यापुढे आव्हानात्मक आहे. हे सगळे पुर्णत्वाला आणून सभासदांना विक्रमी दर देण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह संचालक मंडळाचे सहकार्य नक्की लाभेल,"" अशा शब्दात त्यांनी संबंधितांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तत्पुर्वी रंजन तावरे यांनीही गेली पाच वर्षात सभासदांना सर्वाधिक ऊस दर देत कारखान्याचे महत्वाकांक्षी विस्तारीकरण यशस्वी केल्याचे सांगितले. यावेळी रमेश गोफणे, विश्वास देवकाते, योगेश जगताप, प्रकाश देवकाते, केशवराव जगताप, राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे आदींनी नवीन व जुन्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com