.. तर मुख्यमंत्र्यांनी फिरुच नये :  बाळासाहेब मांगुळकर 

मुख्यमंत्री महा जनादेश यात्रेवर, आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेवर... हे युतीचे सरकार आहे की यात्रा कंपनी, हेच कळायला मार्ग नाही -बाळासाहेब मांगुळकर
Balasaheb-Mangulkar-cm
Balasaheb-Mangulkar-cm

यवतमाळ : पाच वर्षांत काय केले हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा मुख्यमंत्र्यांनी काढली आहे. विरोधक म्हणून शासनाने केलेल्या चुका दाखविण्याचा आमचा अधिकार आहे. निवेदन देणाऱ्यांना, आंदोलन करणाऱ्यांना   येथे पोलीसांकरवी मारहाण करण्यात आली. विरोधकांची इतकीच भीती वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी फिरूच नये, असे कॉंग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर  विश्रामभवनात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

मुख्यमंत्री महा जनादेश यात्रेवर, आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेवर... हे युतीचे सरकार आहे की यात्रा कंपनी, हेच कळायला मार्ग नाही अशी टीकाही त्यांनी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या प्रहार आणि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून आज मारहाण करण्यात आली. याचा निषेध नोंदविण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी  पत्रकार परीषद घेतली. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावून मारहाण केली गेली. कित्येक महिला पदाधिकाऱ्यांना दिवसभर बसवून ठेवले. पोलिसांनी केलेला हा प्रकार निषेधार्ह आहे. नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधींना अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. 

दोन दिवसांत संबंधितावर कारवाई न केल्यास क्रांतीदिनापासून आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील रस्ते, पाणी, शेतकरी आत्महत्या अशा विविध प्रश्‍नांवर निवेदन देण्यासाठी रीतसर परवानगी आम्ही मागितली होती. मात्र, परवानगी दिली नाही. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचे कॉंग्रेसचे यवतमाळ पालिकेतील गटनेते चंदू चौधरी म्हणाले.

मनसेचे अनिल हमदापूरे यांनीही पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली. यावेळी कॉंग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर, चंदू चौधरी, प्रहारचे प्रमोद कुदळे, बिपिन चौधरी, विलास पवार, मनसेचे देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, ललित जैन, लोकेश इंगोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com