Balapur constituency : Sandip Patil, Nitin Deshmukh claim candidature  | Sarkarnama

शिवसंग्रामचे संदीप पाटील, शिवसेनेचे नितीन देशमुख यांचा बाळापूर मतदारसंघावर दावा; भाजप-शिवसेना युती झाल्यास उमेदवारीवरून रणकंदन अटळ

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बाळापूर विधानसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. पक्षाच्या काही ज्येष्ठ व युवा नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी फिल्डींग लावणे सुरू झाल्याने पक्षातंर्गत कुरघोडीचे राजकारण वाढले आहे. त्यातच महायुतीचा घटक पक्ष म्हणुन शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी या मतदारसंघावर दावा केल्याने या मतदारसंघावरून युतीत मोठे रणकंदन होणार आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणात बाळापुर विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करीत ऐनवेळी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना एबी फॉर्म दिला. त्यामुळे संदीप पाटील यांनी भाजपविरुद्ध दंड थोपटत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. त्यामुळे भाजप आणि शिवसंग्राममध्ये झालेल्या मतविभाजनाचा फायदा भारिप बमसंचे आमदार बळीराम सिरस्कार यांना मिळाला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपकडून या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. 

मात्र, पक्षातंर्गत इच्छुकांची संख्या वाढत असल्याने पक्षातंर्गत कुरघोडीचे राजकारणही उफाडून आले आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण मोरखडे, माजी जिल्हाध्यक्ष मनोहरराव राहणे यांच्यासोबतच महापौर विजय अग्रवाल इच्छुक आहेत. या मतदारसंघातील सामाजीक समीकरण लक्षात घेता भाजप येथे कुणबी कार्ड खेळण्याची शक्‍यता आहे. तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष म्हणुन संदीप पाटील यांनीही मतदारसंघावर दावा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. 

शिवसेनेचा एकला चलो रे 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख बाळापूर मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. भाजप-शिवसेना आणि शिवसंग्रामची युती झाली तर बाळापुर मतदारसंघ कोणाला द्यावा यावरच रणकंदन माजणार आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख