समतोल आहार, नियमीत योगासनामुळे मी  'फिट' : आमदार संजय सावकारे  - Balanced diet & Yoga Is secret of my fitness - MLA Sanjay Savkare | Politics Marathi News - Sarkarnama

समतोल आहार, नियमीत योगासनामुळे मी  'फिट' : आमदार संजय सावकारे 

श्रीकांत जोशी : सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 मे 2018

आता नियमीत योगासन व प्राणायाम करतो शिवाय समतोल आहार घेतो. त्याचा मला निश्‍चितच फायदा झाला.

 -आमदार संजय सावकारे

 

भुसावळ   : "मी आमदार होण्याआधी फिरणे व काही व्यायामाचे प्रकार करत होतो. मात्र त्यात नियमीतपणा नव्हता. आमदार झाल्यावर हे प्रमाण आणखी कमी झाले. सततचा प्रवास त्यात जास्त वेळ बैठक यामुळे मणक्‍यांचा त्रास सुरु झाला. माझी पत्नी सौ. रजनी ही नियमीत योगासन करीत होती. तिला शिकविण्यासाठी एक मॅडम यायच्या त्यांनी मलाही योगासनाचे काही प्रकार करण्याचा सल्ला दिला. मी त्या प्रकारची योगासन शिकलो. आता नियमीत योगासन व प्राणायाम करतो शिवाय समतोल आहार घेतो. त्याचा मला निश्‍चितच फायदा झाला." भुसावळचे आमदार संजय सावकारे आपल्या फिटनेसचे रहस्य सांगत होते. 

जळगाव जिल्ह्यातील  तरुण  व तडफदार  आमदार  सावकारे उत्साही आहेत .  राजकारणात येण्याआधी ते एका कंपनीत इंजिनिअर होते. त्यानंतर तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांचे ते खाजगी स्विय सहाय्यक झाले. पुढे मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने ते आमदार झाले. भुसावळ मतदारसंघातून  पहिले राज्यमंत्री होण्याचाही मान त्यांना मिळाला. जिल्ह्याचे पालक मंत्री देखील ते होते.

लोकलेखा समितीचे सदस्य असल्याने सततचा प्रवास त्यांच्या नशीबी आहे. शिवाय मतदारसंघातही फिरावे लागते.परिणामी त्यांना मणक्‍यांचा त्रास सुरु झाला. त्याचे रुपांतर स्पॉंडिलाईसिस होण्यात झाले. डॉक्‍टरांना दाखविले त्यांनी गोळ्या दिल्या की तेवढ्या पुरते बरे वाटायचे. 

आमदार सावकारे म्हणतात, " माझी पत्नी रजनी नियमीत योगासन करते तिला शिकविण्यासाठी संध्या मेहंदळे या योगशिक्षिका येत असत.त्यावेळी त्यांनी मलाही योगासनाचे काही प्रकार व प्राणायाम करण्याचा सल्ला दिला. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला होता. त्यामुळे मला सुर्दशनक्रिया करता येत होती. "

"त्यामुळे योगासन व प्राणायाम करणे जड गेले नाही. आज मी अनुलोम विलोम, कपालभाती आदी प्राणायाम करतो. घरी असलो तर नियमीत करतो अगदी पत्नी उठवून करायलाच लावते. सुर्यनमस्काराच्याही काही स्टेप्स करतो. स्पॉंडिलायसिसचा त्रास असल्याने शिर्षासन व सर्वांगासन करीत नाही. मुंबईला असेल त्यावेळी बीचवर सकाळी तीन किलोमीटर फिरायला जातो. घरी कधी कधी सायकल चालवतो. जिमसाठी रुम तयार केली आहे पण अजुन साहित्य घेतलेले नाही. " असेही आमदार सावकारे यांनी सांगितले . 

आहाराबाबत बोलताना श्री. सावकारे म्हणाले ,"जेवण मला साधेच आवडते. वरण भात भाजी पोळी हा माझा आहार आहे. मात्र क्वचित मांसाहार करतो. सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मला आवडतात. मात्र कारले, दोडके व गिलके आवडत नाही. उन्हाळ्यात चहा एकदम कमी करुन टाकला आहे. ताक, कैरीचे पन्हे, विविध फळांचा ज्युस घेण्यास मी प्राधान्य देतो. हिवाळ्यात सकाळी रोज एक डिंकाचा लाडू खातो. औषध घेण्यापेक्षा योग्य आहार करण्याला मी जास्त महत्व देतो. "

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख