`तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे मी ठाकरे कुटुंबीयांसोबत ...पण दोघे भाऊ?`

नांदगावकर यांना नक्की काय सुचवायचं आहे?
`तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे मी ठाकरे कुटुंबीयांसोबत ...पण दोघे भाऊ?`

पुणे : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. पण त्यांच्या एका प्रश्नाने सर्वांना चकीत केले आहे.

``आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत व तुमच्या सावलीसोबत कायम आहे व कायम राहील.... मात्र दोघे भाऊ..,``असा आपल्या पोस्टचा शेवट करत त्यांनी उद्धव आणि राज यांच्याबद्दल लिहिले आहे. नांदगावकरांनी स्पष्ट सुचविले नसले तरी दोघांनी एकत्र यावे, ही त्यांची भूमिका जुनीच आहे.

नांदगावकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की

17 नोव्हेंबर आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या आयुष्यातला व भारतीय राजकारणातला काळा दिवस. बरोब्बर सात वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आमच्या दैवताला देवाज्ञा झाली व कट्टर शिवसैनिकांबरोबर अखंड महाराष्ट्र पोरका झाला. आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब गेले...... 

 साहेब सात वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला पोरकं करून निघून गेलात परंतु तुम्ही दिलेल्या शिकवणी, आदर्श, संस्कार आजही माझ्यासहित सर्व शिवसैनिकांनी स्वतःमध्ये जपुन ठेवले आहेत. आयुष्यामध्ये कितीही आव्हानं आली तरी धीराने त्याचा सामना कसा करायचा, कितीही अडचणी आल्या तरी आपली मुल्ये जपून ध्येयं साध्य कसं करायचं हे तुम्ही शिकवलंत.जेव्हा बाहेर वादळ असत तेव्हा शांत बसायच व जेव्हा बाहेर वादळ नसतं तेव्हा वादळ निर्माण करायच ही शिकवण तुम्ही आम्हाला दिलेली आहे व संयम कधी सोडायचा याची पण शिकवण तुम्ही दिलीत. आम्हाला आजही सार्थ अभिमान वाटतो तुमचा कट्टर शिवसैनिक म्हणवुन घ्यायला. तुम्ही प्रेमाने, मायेने पाठीवरून फिरवलेला हात व वडीलकीच्या नात्याने ऐकवले शब्द तसेच योग्यवेळी दिलेली शाब्बासकीची थाप हे सर्व आठवलं वाटतं कि आत्ता यावं तुमच्याकडे व तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं. हे सर्व लिहीत असताना तो तुमच्यासोबतचा सहवासातील काळ डोळ्यासमोरून जातोय आणि तुमच्या आठवणीनी  क्षणभर डोळ्यात पाणी उभं राहतंय..... 

आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत व तुमच्या सावलीसोबत कायम आहे व कायम राहील..... 
मात्र दोघे भाऊ..........

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.
आपला नम्र 
बाळा नांदगावकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com