महावितरण सोबतच बकोरिया यांच्याकडे सिडकोचा अतिरिक्त पदभार

महावितरण सोबतच बकोरिया यांच्याकडे सिडकोचा अतिरिक्त पदभार

औरंगाबाद : अकोला येथे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून गेलेल्या ओम प्रकाश बकोरिया यांची दोन आठवड्यातच महावितरणच्या औरंगाबाद येथील प्रादेशिक विभागाच्या व्यवस्थापकीय सहसंचालकपदी बदली करण्यात आली होती.

आज पंधरा दिवसांनी म्हणजे सायंकाळपर्यंत बकोरिया पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, महावितरण सोबतच बकोरिया यांच्याकडे सिडकोच्या मुख्य प्रशासक पदाचा अतिरिक्त पदभार देखील सोपवण्यात आला आहे. 

औरंगाबाद महापालिकेचे डॅशिंग आयुक्त म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या बकोरिया यांची वर्षभरातच अकोला येथे बदली करण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु कुठलीही तक्रार न करता बकोरिया यांनी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता.

जेमतेम दोन आठवडे उलटत नाही तोच पुन्हा बकोरिया यांची औरंगाबाद येथे महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयात सह व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. कौटुंबिक अडचणीमुळे बकोरिया यांना पदभार स्वीकारण्यास दोन आठवडे उशीर झाला. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत ते पदभार स्वीकारतील अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

महावितरण बरोबरच बकोरिया यांच्याकडे सिडकोच्या मुख्य प्रशासक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचे आदेश देखील नुकतेच प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी बकोरिया या दोन्ही पदांचा पदभार स्वीकारणार आहेत. सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी रायगड येथील जिल्हाधिकारी श्रीमती उगले यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी पदभारच स्वीकारला नाही. त्यामुळे बकोरिया यांच्याकडेच सिडकोचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. 

अधिकाऱ्यांनी घेतला धसका 
महापालिका आयुक्त असताना बकोरिया यांनी अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी लावून बोगसगिरीला चाप लावला होता. त्यांची ही ख्याती माहीत असल्यामुळे सिडकोच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बकोरिया यांच्या नियुक्तीचा धसका घेतला आहे. सुनील केंद्रेकर यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष व कठोर अधिकाऱ्याचा कार्यकाळ अनुभवल्यानंतर त्यांच्या बदलीने सिडकोतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता.

परंतु मुख्य प्रशासकपदी नियुक्ती मिळालेल्या श्रीमती उगले रुजू न झाल्यामुळे सिडकोचा पदभार बकोरिया यांच्याकडे सोपविण्याचा शासनाने निर्णय घेतला. या नव्या आदेशाची माहिती मिळताच अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com