विजयाचा 'कॉन्फिडन्स' की मतदारांच्या प्रेमातून उतराई? राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे करणार आभार दौरा

शेतकरी पुत्र या 'टॅगलाईन'मुळे बजरंग सोनवणेंची भलतीच हवा झाली. पक्षाच्या नेत्यांनी जेवढी ताकद लावली त्यापेक्षा त्यांना लोकांतूनच मोठा प्रतिसाद मिळाला. दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात असला तरी निकालापूर्वीच राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी आभार दौऱ्याचे नियोजन केल्याने चर्चा होत आहे.
विजयाचा 'कॉन्फिडन्स' की मतदारांच्या प्रेमातून उतराई? राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे करणार आभार दौरा

बीड : लोकांतूनच प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण केली. आता त्यांनी निकालापूर्वी मतदार संघात आभार दौऱ्याचे नियोजन केल्याने हा सोनवणेंचा 'कॉन्फिडन्स' आहे की लोकांच्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न आहे, अशी चर्चा होत आहे. निकालापूर्वीच आभार दौरा राजकारणातले मोजकेच उदाहरण ठरावे.

लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आणि भाजपला जणू ही निवडणुक एकतर्फीच वाटू लागली. 'कोण होणार बळीचा बकरा' अशा पोस्ट भाजप समर्थक फिरवू लागले. पण, ऐनवेळी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आणि निवडणुकीचा नुरच पलटला. सुरुवातीला तीन लाखांनी विजयाचा दावा करणाऱ्या भाजपच्या गोटात सर्वच मतदार संघातील विद्यमान होते. तरीही पक्षाच्या नाकी नऊ आले. बजरंग सोनवणे समर्थकांनी प्रचारात आणि समाज माध्यमांत 'शेतकरीपुत्र' ही टॅगलाईन वापरली आणि सोनवणेंची चांगलीच हवा झाली. पक्षनेत्यांनी आपापल्या मतदार संघात जोर लावलाच. पण, सोनवणेंना लोकांमधूनच मोठे समर्थन मिळू लागले. त्यामुळे भाजपला मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री आणि शेवटच्या टप्प्यात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसलेंनाही मतदार संघात बोलवावे लागले. 

मतदानानंतरही आता दोन्ही पक्षांकडून आकड्यांच्या बेरजा - वजाबाक्या करुन विजयाचे दावे केले जात आहेत. भाजपच्या गोटात तरी थोडीशी भीती असली तरी राष्ट्रवादीच्या गोटात विजयाचा अधिकच 'कॉन्फिडन्स' आहे. त्यातच आता निकालापूर्वी त्यांनी मतदार संघात आभार दौऱ्याचे नियेाजन केले आहे. शनिवार पासून आठ दिवसांच्या आभार दौऱ्यात बजरंग सोनवणे पाटोदा, आष्टी, बीड, केज, शिरुर कासार, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी, वडवणी आणि अंबाजोगाई या लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांतील काही गावांत भेटी देऊन मतदारांचे आभार मानणार आहेत. मतदानानंतर आणि निकालापूर्वी बजरंग सोनवणे हे आभार दौरा काढून हा नवा पायंडा तर पाडत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com