bajaj group assured Rs 100 crore help for corona calamity | Sarkarnama

बजाज उद्योगसमूह शंभर कोटींची मदत करणार! #fightagainstcorona

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 26 मार्च 2020

भारतीय उद्योगपतीही आता मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत. 

पुणे : कोरोनावरील संकटावर मात करण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरांतून मदत होत असताना भारतीय उद्योगपतीही आता पुढे सरसावले आहेत. महिंद्र ग्रूपचे आनंद महिंद्र यांनी मदत जाहीर केल्यानंतर बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांचे साह्य करण्याचे घोषित केले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आणि बजाज यांचे अभिनंदन केले.

सरकार सोबत काम करताना जवळपास 200 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने कोविड2019 च्या अटकावासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बजाज यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गरजू लोकांपर्यंत मदक पोहोचेल, याची आम्ही खबरदारी घेऊ. पुण्यात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी भरीव मदत करण्याचे बजाज यांनी आश्वासन दिले आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील आय़सीयू अद्ययावत करण्यासाठी ही मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हेन्टिलेंटर्स आणि इतर सुविधा खरेदी करण्यासाठीही निधी दिला जाणार आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी मदत करणे क्वारंटाईनसाठीच्या सुविधा देण्यात येणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील जनतेला याचा फायदा होणार असल्याचे राहुल बजाज यांनी म्हटले आहे.

बाधितांना अन्न व निवारा देण्यासाठी विविध संस्थांशी बोलणी सुरू आहेत. रोजंदारीवरील कामगार, निराधार मुले यांनाही मदत करणार आहे. सॅनिटायझेशनची सुविधा देण्यासाठीही ही रक्कम वापरली जाणार आहे. अनेक लोक शहराकडून गावाकडे गेले आहेत. गावाकडे गेलेल्या अशा गरजू लोकांनाही मदत केली जाईल. त्यासाठी रोख मदत आणि जीवनाश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. 

आनंद महिंद्र यांनीही व्हेंटिलेटर्स देण्याचे जाहीर केले आहे. परदेशांतील अनेक उद्योगपतींनी त्यांच्या देशात मोठी मदत दिली आहे. भारतातील अब्जाधीश अशी मदत करत नसल्याची टीका काही दिवसांपूर्वी झाली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख