अब तक तीस.. आमदारांचे राजीनामे स्वीकारण्याचा बागडेंचा विक्रम...

अब तक तीस.. आमदारांचे राजीनामे स्वीकारण्याचा बागडेंचा विक्रम...

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पक्षांतर किंवा अन्य कारणांमुळे तीस आमदारांनी दिलेले राजीनामे हरिभाऊ बागडे यांना स्वीकारावे लागले आहेत. पुढील दोन दिवस आणखी काहीजणांचे राजीनामे येण्याची शक्‍यता देखील बागडे यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केली. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षातील आमदारांची संख्या वाढली होती. सत्तेतील वाटा, आमदाकीचे तिकिट याबद्दल शब्द मिळाला की, मग राजीनामा देण्यासाठी कॉंग्रसे-राष्ट्रवादीच्या अनेक नेते, माजी मंत्री, आमदारांनी धावपळ केल्याचे दिसून आले होते. अगदी विधानसभा अध्यक्षांना आहे तिथे गाठून राजीनामा देण्यासाठी काहीजणांना तर थेट खाजगी विमाने देखील देण्यात आली होती. 

विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हरिभाऊ बागडे हे देखील आपल्या फुलंब्री मतदारसंघात तळ ठोकून होते. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी आमदार किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाड्या, तांडे, वस्त्या पालथ्या घालाव्या लागल्या होत्या. मेलवर आलेला राजीनामा देखील विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून स्वीकारला गेला. 

तीन-चार दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आमदारकीचा राजीनामा बागडे यांनी असाच मेलवर स्वीकारला होता. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांचा देखील राजीनामा मेलवर स्वीकारून तो बागडे यांनी मंजुर केला आहे. गेल्या काही काळात विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बागडे यांनी राज्याच्या विविध भागातील तीसहून अधिक आमदारांचे राजीनामे स्वीकारले आहेत. अगदी विधानसभेतील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज नितेश राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर येऊन थांबला आहे. यातील काही राजीनामे हे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे देखील आहेत. 

मे ते ऑक्‍टोबर दरम्यान राजीनामा दिलेल्या राज्यातील आमदारांची संख्या तीस वर पोहचली आहे. डॉ. आशिष देशमुख, सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव, अनिल गोटे, जयदत्त क्षीरसागर, गिरीश बापट, राधाकृष्ण विखे, उन्मेष पाटील, हेमंत पाटील, सय्यद इम्तियाज जलील, पांडुरंग वरोरा, शिवेंद्रसिंह भोसले, वैभव पिचड, कालीदास कोळंबकर, संदीप नाईक, निर्मला गावीत, विलास तरे, दिलीप सोपल, जयकुमार गोरे, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, अब्दुल सत्तार, अजित पवार, भारत भालके, नितेश राणे यांचा यात समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com