Badnera MLA Ravi Rana Election Campaign in Trouble | Sarkarnama

'आयी दिवाली..भरलो किराणा...चुन के लाओ रवी राणा'.. प्रचार घोषणा भोवणार!

अरुण जोशी
रविवार, 8 डिसेंबर 2019

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी बडनेरा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिजे यांना दिलेल्या पत्रात आ.राणा यांच्याकडून किराणा वाटपाबाबत वाटलेली व भातकुली पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या ३३१० कूपनची नोंद शॅडो रजिस्टरमध्ये घेवून निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली. अधिनियम १९५१च्या कलम १२३ वर १२७ नुसार फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अमरावती : बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान केलेला वाकप्रचार त्यांना भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहे. निवडणूक निरीक्षक अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत हा सर्व प्रकार उघडकीस आल्यामुळे त्यांच्या विरोधात मतदारांना प्रलोभन दाखविण्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी भातकुली पोलिसांना दिले आहेत. 

या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्यावतीने बडनेरा मतदान संघाच्या निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिगे यांनी भातकुली ठाण्यात तशी तक्रार यापूर्वीच नोंदविली असून त्याबाबत भातकुली पोलिसांनी तसे गुन्हे सुध्दा दाखल केले आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या निवडणुकीत झालेल्या विजयावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. रवी राणा यांनी बडनेरा मतदार संघाची निवडणूक लढवितांना अवलंबिलेल्या पद्धतीची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. रवि राणा यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यांनी निर्धारीत २८ लाखापेक्षा जास्त खर्च केल्याचे चौकशीत आढळून आल्यामुळे राणा चौकशीच्या फेरीत अडकले आहेत.
 
कार्यालयांतर्गत दैनंदिन छायांकित रजिस्टरमध्ये केलेल्या खर्चाची नोंद व आमदार राणा यांनी सादर केलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदीमध्ये ४० लाख ४५ हजार ८९७ रुपयांची तफावत आढळून आली आहे. ही बाब निवडणूक आयोगाकडे निवडणूक निरीक्षक श्रीरामकृष्ण बंडी यांनी २० नोव्हेंबर रोजी निर्दशनास आणून दिली. यावेळी राणा यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून निवडणुकीत भ्रष्ट प्रकाराचा अवलंब करुन निवडणूक लढविल्या प्रकरणी रवी राणांच्या विरुध्द तक्रार नोंदविली आहे. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी बडनेरा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिजे यांना दिलेल्या पत्रात आ.राणा यांच्याकडून किराणा वाटपाबाबत वाटलेली व भातकुली पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या ३३१० कूपनची नोंद शॅडो रजिस्टरमध्ये घेवून निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली. अधिनियम १९५१च्या कलम १२३ वर १२७ नुसार फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रचारासाठी रवि राणा यांनी संदेश पाठवून १० वर्षांपर्यंत मोफत किराणा देण्याचे आश्वासन देतानाच तसे कार्ड मतादारांना वितरीत केल्याचे आढळुन आले आहे. 

मतदारांना प्रलोभन देणे हा प्रकार लाचखोरीच्या व्याख्येत येत असल्याने अशाप्रकारच्या विशिष्ट गुन्ह्याची नोंद करण्यात यावी असे सुध्दा आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. झालेल्या तक्रारीनंतर राजकीय दबाव वाढल्यामुळे तक्रारीचे पुढे काय झाले याची माहिती प्राप्त मिळू शकली नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख