...अन्यथा कृषी सचिवांच्या कार्यालयात फवारणी : बच्चू कडू 

 ...अन्यथा कृषी सचिवांच्या कार्यालयात फवारणी : बच्चू कडू 

यवतमाळ : कीटकनाशकाच्या फवारणीमुळे जिल्ह्यात 18 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला, तर शेकडो शेतकरी, शेतमजूर बाधित झाले आहेत. शासनाने गंभीर दखल न घेतल्यास मंत्रालयात कृषी सचिवांच्या कार्यालयात फवारणी करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनी दिला. 

सोमवारी (ता. दोन) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची आमदार कडू यांनी टिटवी व आकपुरी येथे भेट घेतली. त्यानंतर रात्री फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची त्यांनी रुग्णालयात भेट घेत संवाद साधला. मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर, विषबाधा झालेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपये सानुग्रह मदत करावी, अशी मागणी आमदार कडू यांनी केली. 

शासन मदत करीत नसेल तर, मंत्रालयातील कृषी सचिवाच्या कार्यालयात कीटकनाशकाची फवारणी करू, असा इशारा दिला. 
शेकडो रुग्ण विषबाधित झाल्यानंतर सुद्धा त्यांना बाहेरून औषध आणावे लागत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापुरे, विलास पवार, आशीष तुपटकर, नितीन महल्ले, चंद्रकांत बोरले, आकाश चिंचोळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

म्हणूनच आपला "भिडू' 
फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात येत असल्याचा निरोप आमदार कडू यांनी प्रमोद कुदळे यांना दिला. मात्र, लगेच त्यांच्या मामाचे निधन झाल्याची माहिती मिळाली. दु:खाच्या प्रसंगी अंत्यसंस्कार आटोपले. सोमवारी (ता.दोन) आमदार कडू यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. नातेवाईक व मित्रपरिवाराची सकाळपासूनच घरी गर्दी सुरू झाली. माझी जनता दु:खात असताना मी आनंद कसा साजरा करू, असे म्हणून थेट यवतमाळ गाठले. आमदार कडू जेथे जातील तेथे कार्यकर्ते "आपला भिडू बच्चू कडू'असा नारा का लावतात, याची प्रचिती यानिमित्ताने अनेकांना आली. जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांना अद्याप रुग्णालयात जाऊन विषबाधितांची भेट घेण्याचा मुहूर्त सापडू नये, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com