खासदार व्हायचे हा हेतू नाही, पण दानवेंना पाडायचे हे नक्की- बच्चू कडू

खासदार व्हायचे हा हेतू नाही, पण दानवेंना पाडायचे हे नक्की- बच्चू कडू

औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा सर्वप्रथम मी केली होती. खासदार व्हायचा हा त्यामागचा हेतू नाही, तर शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंना धडा शिकवून पराभूत करायचे ही भूमिका होती. त्यावर मी आजही ठाम आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जालन्यातील सगळ्या राजकीय समीकरणांवर मी बारकाईने लक्ष ठेवून आहे. स्वतंत्र निवडणूक लढवावी, की कॉंग्रेसच्या उमेदवाराला दानवेंच्या विरोधात पाठिंबा द्यावा याचा विचार करतोय अशा शब्दात अचलपूरचे आमदार तथा प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी आपला दानवे विरोध कायम असल्याचे सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

"इतकी तूर खरेदी केली, तरी रडतात साले' असे वादग्रस्त विधान केल्यानंतर रावसाहेब दानवेंच्या विरोधात जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी गेल्यावर्षी केली होती. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंना पराभूत करण्याचा चंग बांधत बच्चू कडू यांनी थेट भोकरदनमध्ये जाऊन मेळावे आणि कार्यक्रमही घेतले. 

शेतकरी व दानवे विरोधकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारच अशी भूमिका बच्चू कडू यांनी वेळोवेळी जाहीर केली. दरम्यान शिवसेनेचे राज्यमंत्री व जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील रावसाहेब दानवेंच्या विरोधात लोकसभा लढवण्याची घोषणा करत खळबळ उडवून दिली होती. एवढ्यारच न थांबता त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे जालन्यात मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी द्या असा हट्टही धरला. तर दुसरीकडे कॉंग्रेसशी सलगी वाढवत अन्य पर्यायाची देखील तयारी चालवली होती. पण लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकरांच्या बाणाचा रोख दानवेंकडून दुसरीकडे वळल्याचे चित्र आहे. 

खोतकरांनी तलवार म्यान केल्याची चर्चा असतांना आता रावसाहेब दानवेंच्या विरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केलेल्या आमदार बच्चू कडू यांची भूमिका काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता बच्चू कडू म्हणाले, रावसाहेब दानवेंना पराभूत करणे हा माझा एकमेव हेतू आहे. त्यांच्या विरोधात लढण्याची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरण, दानवे यांची आर्थिक ताकद, अर्जुन खोतकरांनी त्यांना दिलेले आव्हान या सगळ्या गोष्टींवर माझे लक्ष आहे. 

जालन्यात मी आणि खोतकर अशा दोंघानी लढणे म्हणजे, दानवेंचा मार्ग सोपा करणे ठरले हे ओळखून दोंघापैकी एकानेच निवडणूक लढवायची अशी चर्चा आमच्यामध्ये झाली होती. अर्जुन खोतकरांनी निवडणूक लढवली तर त्यांना पाठिंबा देण्याची माझी भूमिका आहे. परंतु आता परिस्थीती बदलली आहे. खोतकर दानवेंविरोधात निवडणूक लढवतील की नाही? हे स्पष्टपणे सांगता येत नाही. अशावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कुणाला उमेदवारी देते हे पाहून पुढील निर्णय घेण्याचे मी ठरवले आहे. रावसाहेब दानवेंचा पराभव करू शकेल एवढ्या ताकदीचा उमेदवार कॉंग्रेसने दिला तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार आहे. अन्यथा स्वतंत्र लढण्याचा पर्याय देखील खुला माझ्यासाठी खुला असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसकडून लढण्यासाठी आपल्याला विचारणा झाली का? या प्रश्‍नावर नाही असे उत्तर त्यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com