Bachchu Kadu yatra | Sarkarnama

आमदार बच्चू कडूंची "सीएम टू पीएम' आसूड यात्रा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 मार्च 2017

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व शेतमालांच्या हमी भावात वाढ करावी, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटनेतर्फे नागपूर ते वडनगर (गुजरात) आसूड यात्रा येत्या 11 एप्रिलपासून काढणार आहेत. 

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व शेतमालांच्या हमी भावात वाढ करावी, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटनेतर्फे नागपूर ते वडनगर (गुजरात) आसूड यात्रा येत्या 11 एप्रिलपासून काढणार आहेत. 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून या यात्रेला सुरवात होणार आहे. या आसूड यात्रेत महाराष्ट्रातील जवळपास 50 संघटना सामील होणार असून या यात्रेत 2 ते 3 हजार शेतकरी सामील होणार आहेत. ही यात्रा शेतकऱ्यांसह गुजरातमधील वडनगर येथे जाणार आहे. वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशभरात "चाय पे चर्चा' करून शेतकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांपैकी एकाही आश्‍वासनाची पूर्तता केंद्र सरकारने केली नाही. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री (सीएम) व पंतप्रधान (पीएम) हे अपयशी ठरल्याने सीएम टू पीएम आसूड यात्रा काढणार असल्याची भूमिका आमदार कडू यांनी मांडली. 

वडनगर येथे नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी चहा विकत होते, तेथे जाऊन शेतकरी रक्तदान करणार आहे. या वेळी जवळपास 2 ते 3 हजार शेतकरी मोदींना आठवण करून देण्यासाठी रक्तदान करणार आहेत. मोदी यांनी शेतकऱ्यांना हमी भाव देण्याबाबत आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाचा विसर आता त्यांना पडला आहे. मोदींना अनेक आश्‍वासनाचा विसर पडला आहे. ही आसूड यात्रा महाराष्ट्रातील जवळपास 15 जिल्ह्यातून नाशिकमार्गे गुजरातमध्ये जाणार आहे. येत्या 21 एप्रिलला ही आसूड यात्रा वडनगरला पोहोचणार आहे. या यात्रेमध्ये विजय जावंधिया, रघुनाथ दादा आदी सामील होणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख