Bacchu Kadu's unrully comment on Hema Malini | Sarkarnama

हेमामालिनीही दारू पिते - बच्चू कडू यांचे वादग्रस्त वक्तव्य

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 एप्रिल 2017

स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र आता सत्तेत येऊन त्यांना तीन वर्ष झाली तरी त्यांना आपल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे मोदी यांचा जगात सर्वात उंच पुतळा यवतमाळमध्ये आपण उभारणार आहोत- बच्चू कडू

नांदेड - दारू प्यायलामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हणणे चुकीचे असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले असून आपला हा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी ''७५ टक्के आमदार, खासदार आणि पत्रकार पितात, एवढेच नव्हे तर अभिनेत्री हेमामालिनी देखील रोज एक बंपर दारू पिते. मग तिने आत्महत्या केली का?'' असा प्रश्नही श्री. कडू यांनी उपस्थित केला आहे. खासदार हेमामालीनी यांचे उदाहरण देऊन आमदार बच्चू कडू यांनी आता नवीन वादाला तोंड फोडले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आसुड यात्रेची सुरवात झाली आहे. काल रात्री उशिरा शेतकरी आसूड यात्रा नांदेड शहरात दाखल झाली आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

''केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही शेतकरी व मजूर त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. खासदार आणि आमदारांच्या वेतनात भरमसाठ वाढ केली जात आहे. मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी शेतीमालाला उत्पादन खर्चावर अधारित भाव देण्याचे आश्वासन दिले होते. आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. ही आठवण करुन देण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात आली आहे,'' असे आमदार कडू यांनी यावेळी सांगितले.

सध्याचे सरकार अफजलखानापेक्षाही जास्त लुटारू आहे, अशी टिका आमदार बच्चू कडू यांनी केली. सरकार ‘कलम कसाई’ असल्याची टीका करताना "तलवारीने हजारो जण मरतात. बॉम्बस्फोटांनी लाखो मरतात तर एका चुकीच्या कलमाने कोट्यवधी लोक मरतात,'' असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोजी यांच्या यांचे आयात निर्यात धोरणाचे उदाहरण श्री. कडू यांनी दिले.

''स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र आता सत्तेत येऊन त्यांना तीन वर्ष झाली तरी त्यांना आपल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे मोदी यांचा जगात सर्वात उंच पुतळा यवतमाळमध्ये आपण उभारणार आहोत,'' असेही आमदार श्री. कडू यांनी सांगितले. हा पुतळा उलटा उभारायचा की सरळ हे ऐनवेळी ठरवू अशीही टीपण्णी त्यांनी यावेळी केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख