बच्चू कडू म्हणाले, कृत्रिम धबधबा तयार करा...

...
bachhu kadu
bachhu kadu

अकोला : पर्यटनाला चालना देण्यासाठी नरनाळा किल्ल्यासह परिसराचा विकास करून ग्राम पर्यटन संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास, शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले.

अकोट तालुक्यातील शहापूर येथील वनविभागाच्या विश्रामगृहात नरनाळा किल्ल्याचा पर्यटन विकास करण्यासाठी रविवारी आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अकोट येथील उपवन संरक्षक (वन्यजीव) टी. बेऊला, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे, पुरातत्व विभागाचे संरक्षक सहाय्यक संतोष महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, उपविभागीय अधिकारी अकोट रामदास सिद्धभट्टी, उपवन संरक्षक अकोला विभाग विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेगाव-नरनाळा-चिखलदरा पर्यटन मार्ग
पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शेगाव-नरनाळा-चिखलदरा पर्यटन मार्ग विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री ना. कडू पुढे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील गावीडगड किल्ला व नरनाळा किल्ला असा मार्ग तयार करण्यात यावा जेणे करून शेगाव येथील धार्मिक स्थळाला भेट दिल्यानंतर पर्यटक नरनाळा किल्ल्याला भेट देऊन चिखलदरा येथे जाऊ शकेल. यासाठी नरनाळा किल्ला विकास कार्यक्रमासह वनविभाग, पर्यटनविभाग, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभाग यांनी संयुक्तरित्या अंदाजपत्रक सात दिवसांच्या आत तयार करावे, असे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी दिलेत.

...तर पर्यटकांचे आकर्षण वाढेल
पुरातत्व विभागासह वनविभागाने नरनाळा किल्ल्याच्या महाकाली व्दारवर विकास करावा. प्रेक्षकांसाठी प्रेक्षकगृह, दुर्बिन स्पॉट लाईटींग व साऊंड शो, पोपटखेड धरणावर नौका विहार, शक्कर तलावर कृत्रीमरित्या धबधबा, नौगज तोफ ते खाली पर्यंत स्काय वॉक, राणी महल ते महाकाली गेट पर्यंत ठिकठिकाणी बांध टाकून पाणी अडविणे यासारखे सोई केल्यातर पर्यटकांचे आकर्षण वाढेल आणि नरनाळा किल्ल्याच्या सौंदर्यांत भर पडेल असे ते म्हणाले. नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानूर या आदिवासी गावाचा व्यक्तिगत व सामूहिक लाभाच्या योजना राबवून विकास करावा. पर्यंटनामुळे शहानूर गावाचा विकास होऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असेही ते म्हणाले.

कृत्रिमरीत्या धबधबा तयार करा
पालकमंत्री बच्चू कडू यांनी नरनाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सर्वप्रथम महाकालीव्दारला भेट दिली. महाकाली व्दारच्या विकासासाठी सूचना संबंधिताना दिल्यात. शक्कर तलाव येथे भेट देऊन या तलावात पायडल नौकाद्वारा नौका विहार करणे शक्य आहे का? याबाबत शहानिशा करावी तसेच तलावातील पाण्याचा उपयोग करून सौरउर्जेचा वापर करून कृत्रिमरीत्या धबधबा तयार करण्याबाबत सूचना केल्यात. तसेच नौगज तोफ व राणीमहल येथे सुद्धा पालकमंत्री यांनी भेट दिली.

शहानू गावात लाकुड बँक
शहानूर गाव पालकमंत्री दत्तक ग्राम योजनेत दत्तक घेण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले. शहानूर आदिवासी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जंगलातील खाली पडलेल्या लाकडांना एकत्र करून गावातील लोकांसाठी लाकुड बँक तयार करून त्यातून गावातील परिवारांना आवश्यकतेनुसार जळणासाठी लाकुड उपलब्ध करून देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्यात.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com