नाना पाटेकर नकली फाईट मारते...पण बच्चूभाऊ असली फाईट हाणते!

nana patekar-bacchu kadu
nana patekar-bacchu kadu

नागपूर : नाना पाटेकर यांचा प्रहार हा सिनेमा बघून आपल्या पक्षाचे नाव प्रहार जनशक्ती पक्ष ठेवले, असे गुपित आज शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना उघड केले. निमीत्त होते गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍन्ड टेक्‍नॉलॉजी यांच्या वतीने आज येथील वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित विदर्भ विद्यार्थी संसदेच्या उद्‌घाटन सोहळ्याचे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना राजकारण, निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थेतील गुणदोष खास वऱ्हाडी शैलीत सांगितले. 

माझा नेता दिल्ली किंवा मुंबईत नाही, तर माझ्या मतदारसंघाच्या गावांमधील मायबाप जनता नेता आहे. त्यांनीच मला तब्बल चार वेळा निवडून दिले. बच्चू कडू म्हणाले, "मागच्या निवडणुकीत कार्यकते मला म्हणाले, बच्चू भाऊ यावेळेस मोदी लाट हाये. आपल्याले हिरो नाही त हीरोईन आणा लागते. नाही त काही खर नाही.' काही नावांवर चर्चा झाल्यानंतर नाना पाटेकर यांना आणण्यावर कार्यकर्त्यांचे एक मत झाले. त्यावर मी त्यांना म्हणालो, त्याले आणू त खरी. पण तो काही आपलं ऐकणार नाही. थो आपल्या मतानच बोलते. थो सिनेमात नकली फाईट मारते, पण बच्चू कडू इथं असली फाईट मारते. त्यामुळे आपण कोनालेच आणू नाही. आपण आपलं इमानदारीन काम करु. हे ऐकून कार्यकर्ते कामाला लागले.' हा किस्सा त्यांनी अभिनय करुन इतक्‍या रंजकनेते सांगितला की विद्यार्थ्यांनी अक्षरशः टाळ्याचा पाऊस पाडला.

निवडणूक प्रक्रियेतील दोष सांगताना त्यांनी मतदारांवरच प्रहार केले. ते म्हणाले, "हे कत्तल की रात कोन आणली माहीत नाही. 24 तासात इकडचं तिकडं होऊन जाते. लोकं झेंडे, बॅनरवरचे फोटो पाहून मतदान करतात. 500 रुपये भेटले की मत बदलते. गावात बोकुड बांधल अन तेल मसाले ठेवले की अख्या गावाचं मतदान बदलते. रॅलीची गर्दी अन नेत्यांचे भाषण एकून लोकांचे मत बदलते. आजही 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोक उमेदवाराचे काम पाहून मतदान करीत नाहीत, हे त्यांना ठामपणे सांगितले. जोपर्यंत ही स्थिती बदलत नाही, तोपर्यंत सक्षम लोकशाही अस्तित्वात येणार नाही. आज तुम्ही येथे जरी टाळ्या वाजवित आहात. पण निवडणुकीच्या वेळी, तुमच्याही डोक्‍यात जात घुसतेच, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सुनावले. पण माझ्या मतदारसंघात माझी जात कुणीही पाहात नाही. 500 रुपये घेऊन कुणीही मतदान करीत नाही. तर गरीबातली गरीब म्हातारीही बचत करुन जमविलेले 500 रुपये बच्चू कडुच्या निवडणुकीला देते, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. 

नेत्यांच्या प्रचाराच्या बॅनरवर आपल्या जातीच्या महापुरुषांचे फोटो पाहूनच लोक मतदान करीत असल्याबद्दल कडू यांनी खंत व्यक्त केली. वऱ्हाडी शैलीत "असे लोक बह्याड थुत्रे, अन नेते बी बह्याड थुत्रे. कारण जैसी प्रजा वैसा राजा.' मोठे नेते भाषणाची सुरुवात "भाईयो और बहनो...' अशी करतात. पण प्रत्यक्षात कुणीही यांचा भाई अन बहन असत नाही. हलक्‍या बुद्धीचे लोक त्याला भाळतात, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे हलक्‍या बुद्धीचे लोक पैदा होणेच बंद झाले पाहीजे.', असे ते म्हणाले. हे सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा "मतदार दुधारी तलवार होती है, पैसा, धर्म के प्रभाव से एक धार अगर कमजोर हो गयी, तो दुसरी धार आग का गोला बनती है' हा विचार सांगून मतदारांना जागरुक होण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com