bacchu kadu may get ministerial berth..but? | Sarkarnama

बच्चू कडूंचा राजकीय संघर्ष `गोड` होण्याच्या मार्गावर....पण?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

`प्रहार`चे आमदार बच्चू कडू चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. या वेळी त्यांनी आपल्या संघटनेचा दुसरा आमदारही निवडून आणला. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला तातडीने त्यांनी पाठिंबा दिला. त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्याच अमरावती जिल्ह्यात आणखी दोघे इच्छुक आहेत. 

अमरावती : राज्यातील सत्तांतराचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटू लागले असून जिल्ह्यात भाजपला रोखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी कुणाची वर्णी मंत्रीमंडळात लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसच्या आमदार ऍड. यशोमती ठाकूर, प्रहारचे बच्चू कडू व स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांच्याभोवती ही चर्चा फिरत आहे.

पश्‍चिम विदर्भातील अमरावती जिल्हा वगळता इतरत्र भाजपला विधानसभा निवडणुकीत रोखण्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला फार यश आले नाही. त्या तुलनेत अमरावती जिल्ह्यातील आठ पैकी केवळ एकच जागा भाजपला मिळू शकली.

आघाडीने अमरावती शहरासह दर्यापूर, मेळघाट या गतवेळी भाजपकडील जागा हिसकावून घेतल्या. मोर्शीतही भाजपला आघाडीतील स्वाभीमानी शेतकरी संघटनेने रोखले तर तिवसा कॉंग्रेसने कायम राखले. यामध्ये तिवस्यातून यशोमती ठाकूर तीन वेळा व अचलपूरमधून बच्चू कडू चार वेळा निवडून आले. कॉंग्रेसच्या सुलभा खोडके यांनी अमरावतीत भाजपला रोखण्यात महत्वाची भूमिका निभावली. आघाडीच्या पाठिंब्यावर विजयी झालेले बडनेराचे आमदार रवी राणा मात्र भाजपला साथ देत निघून गेले.

राज्यात सत्तासमीकरणे बदलल्यानंतर मंत्रीमंडळात अमरावतीला मोठे स्थान मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. भाजप सरकारमध्ये अमरावतीला डॉ. अनिल बोंडे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रीपद मिळाले खरे, मात्र ते औटघटकेचे ठरले. त्यापूर्वी विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांना राज्यमंत्री पद मिळाले होते. नवीन सत्तेत कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर, प्रहारचे बच्चू कडू व स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांची नावे समोर आली आहेत. जिल्ह्यात कॉंग्रेसच्या तीन तर प्रहारच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी व सेनेला एकही जागा मिळाली नाही. राज्यातून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा एकमेव उमेदवार या जिल्ह्यातील मोर्शीमधून निवडून आला आहे.

सत्ता स्थापनेत बहुमतासाठी प्रहारने साथ दिली, तर स्वाभीमानी शेतकरी आघाडीत सहभागी होता. मित्र पक्षांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची भूमिका आहे. त्यामुळे प्रहारच्या बच्चू कडू व देवेंद्र भुयार यांची नावे समोर आली आहेत. तर कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांची तिसरी टर्म व पक्षातील भूमिका विचारात घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. कॅबिनेट व राज्यमंत्री अशी दोन पदे या जिल्ह्यास मिळण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. कॉंग्रेसला आणखी शक्ती वाढवायची असल्याने यशोमती ठाकूर हा त्यांच्यासमोर पर्याय आहे. या तिघांपैकी नेमकी कुणाची वर्णी लागेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत चर्चा मात्र सुरु राहणारच.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख