विधानपरिषदेसाठी कॉंग्रेसकडून अंबडच्या बाबुराव कुलकर्णी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

  विधानपरिषदेसाठी कॉंग्रेसकडून अंबडच्या बाबुराव कुलकर्णी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

औरंगाबाद : जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष भवानीचंद भालचंद्र उर्फ बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना बी फॉर्म दिला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सुभाष झांबड यांच्यासह विनोद पाटील यांना पुरस्कृत किंवा पाठिंबा देण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

औरंगाबाद-जालना विधान परिषदेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून अखेर बाबुराव कुलकर्णी यांनाच पक्षश्रेष्ठींनी पसंती दिली आहे. गेल्या आठवडाभरापासून कॉंग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू होती. मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढणारे विनोद पाटील यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊन आपल्या पुरस्कृत करण्याची मागणी केली होती. पण ती फेटाळण्यात आल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 

कॉंग्रेसकडून सुभाष झांबड, बाबुराव कुलकर्णी व जालना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ राजाभाऊ देशमुख यांची नावे कॉग्रेस श्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. 2013 मध्ये ऐनवेळी बाबुराव कुलकर्णी यांना दिलेला बी फॉर्म काढून सुभाष झांबड यांना देण्यात आला होता. सुभाष झांबड यांनी तेव्हा शिवसेनेच्या किशनचंद तनवाणी यांचा पराभव करत विजय मिळवला होता. परंतु आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बाबुराव कुलकर्णी व त्यांच्या मनात घर करून होती. यावेळी विधान परिषदेची निवडणुक लढवण्यची इच्छा व्यक्त केल्यानंतर पुन्हा सुभाष झांबड त्यांच्यासाठी अडसर ठरतात की काय ? अशी चर्चा होती. औरंगाद जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांच्या गांधी भवनात झालेल्या बैठकीत देखील झांबड यांच्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. 

बाबुराव कुलकर्णी यांचे नाव निश्‍चित झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. परंतु बी फॉर्म हाती येत नाही तोपर्यंत उमेदवारी अंतिम समजण्यात येत नव्हती. कॉंग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, बाबुराव कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आज मुंबईत दाखल झाले. 

दुपारी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कुलकर्णी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना बी फॉर्म दिला. आता शिवसेना-भाजप युतीचे अंबादास दानवे विरुध्द कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांच्यात थेट लढत होण्याची शक्‍यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com