कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर यांचे मंगळवार (ता.५) मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले.
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

अकोला - राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर यांचे मंगळवार (ता.५) मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. 

गत काही महिन्यांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेबांनी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. बुधवार (ता.६) दुपारी १२ वाजता धाबा येथे त्यांच्या घरी अंत्यदर्शनानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील. 

बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गावातील ग्रामपंचायत सदस्य पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 

उपसरपंच, सरपंच, बार्शीटाकळी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि.प. सभापती नंतर अध्यक्ष असा प्रवास करीत त्यांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली आणि त्यात ते विजयीसुद्धा झाले. 

आमदार झाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला. याच सरकारमध्ये त्यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागली. जलसंधारण खातं त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना गती दिली. यासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले. यासोबत त्यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकही लढविली होती. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना धाबेकरांनी विकासकामांचा धडका लावत अकोला जिल्हा परिषदेला राज्यात वेगळी ओळख निर्माण करून दिली. सुतगिरणी, साखर कारखान्याची उभारणीही त्यांनी केली. रोखठोक भूमिका घेणारे नेते व विकास महर्षी म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे व मैत्रिपूर्ण संबंध होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com