बबन साळगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट; सावंतवाडीतून राष्ट्रवादीची उमेदवारी?

सावंतवाडीयेथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.
मुंबई येथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शेजारी एम. के. गावडे, अमित सामंत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी.
मुंबई येथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शेजारी एम. के. गावडे, अमित सामंत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी.

सावंतवाडी - येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. 

साळगावकर यांच्या बंडामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील चुरस वाढणार आहे. उमेदवारी मिळाल्यास साळगावकर यांना नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडे जिल्ह्यासह संपूर्ण कोकणचे लक्ष लागून राहिले आहे. दोन वेळा आमदार झालेले केसरकर यावेळीही शिवसेनेचे उमेदवार आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले साळगावकर त्यांच्या विरोधात बंडाच्या पवित्र्यात आहेत. ते राष्ट्रवादीमधून लढतील अशी चर्चा होती. आज त्यांनी पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यामुळे त्यांचे शिवसेनेतील बंड जवळपास निश्‍चित मानले जात आहे.
त्यांनी मुंबई येथे जाऊन अध्यक्ष पवार यांची भेट घेतली. 

प्रदेश राष्ट्रवादीकडून ही भेट निश्‍चित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमीत सामंत, या मतदार संघातून इच्छूक असलेले एम. के. गावडे हेही उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत साळगावकर व श्री. पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे समजते. 

पवार यांनी साळगावकरांच्या सावंतवाडीतील उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याचेही समजते.  याबाबत श्री. साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “शरद पवार हे मोठे नेते आहेत. ही माझी सदिच्छा भेट होती. पुढचा निर्णय आणि बैठकीतील तपशील सावंतवाडीत आल्यावर जाहीर करू; मात्र ही अतिशय सकारात्मक चर्चा झाली. 

तर नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार

साळगावकर हे गेल्या पालिका निवडणूकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. ते थेट जनतेतून नगराध्यक्ष बनले आहेत. राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना शिवसेनेच्या तिकीटावर मिळालेले नगराध्यक्ष पद सोडवे लागणार आहे. 

साळगावकरांचा प्रवास

श्री. साळगावकर हे गेली 35 हून अधिक वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या राजकिय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेतून झाली. सावंतवाडी तालुक्यात शिवसेना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवसेनेकडूनही ते विधानसभा उमेदवारीचे दावेदार होते; मात्र शिवसेनेने शिवराम दळवींना उमेदवारी दिली. नंतरच्या काळात शिवसेनेशी झालेल्या मतभेदामुळे ते राष्ट्रवादीत आले. केसरकर यांच्या समवेत शहराच्या राजकारणात सक्रीय झाले. सावंतवाडीत नगरसेवक ते नगराध्यक्ष असा राजकीय प्रवास त्यांनी केला. ते केसरकरांसोबत शिवसेनेत यायला उत्सुक नव्हते; मात्र गेल्या पालिका निवडणूकीत राजकीय आग्रहामुळे त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली; मात्र केसरकर यांच्याशी निर्माण झालेल्या मतभेदामुळे गेली दोन वर्षे ते त्यांच्यापासून दुरावत गेले. त्याचेच रुपांतर या सर्व राजकीय घडामोडीत झाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com