Ayodha`s mood changes but not open celebration | Sarkarnama

अयोध्येचा नूर बदलला..पण फटाकेही लपतछपत वाजविले!

मंगेश कोळपकर
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येतील हा `आॅंखो देखा हाल`

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी बाबतचा निकाल दिला अन् अयोध्येचा नूर बदलत गेल्याचे शनिवारी सकाळी दिसून आले. 

रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रशासनाने जय्यत तयारी केली. सुमारे 30 हजारांहून अधिक पोलिस अयोध्येत तैनात करण्यात आले आहेत. निकालापूर्वी सकाळी मुख्य रस्त्यांवरील दुकाने बंद होती. तर लोकही फारशी रस्त्यावर नव्हती.  त्यातच देशातील आणि परदेशातील पत्रकारही येथे आले आहेत' त्यांची वर्दळ होती.  तर अयोध्येलगतच्या फ़ैजाबादमध्येही बंद दुकाने, गटागटाने फिरणारे नागरिक या मुळे तणाव दिसत होता.  

रामजन्मभूमीकडे जाणारे सर्वच रस्ते, अंतर्गत गल्लीबोळही पोलिस -प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच लाकडी बॅरिकेडिंग करून बंद करून टाकले आहेत. आज सकाळपासून तर फारच कडक कडेकोट बंदोबस्त  पोलिसांनी केला.  पायी जातानाही मोबाईल, कॅमेरा नेण्यास परवानगी देण्यात येत नव्हती.

न्यायालयाने रामजन्मभूमीच्या बाजून निकाल दिल्यावर चक्क हनुमानगढी जवळ फटाक्यांची आतषबाजी छुपेपणाने करण्यात आली. पोलिस पोचेपर्यंत आतषबाजी करणारे गुल झाले होते. याच हनुमानगढी परीसरात तुलसी स्मारक आणि काही मठ आहेत. निकाल लागल्यावर तेथील साधू रामलल्लाच्या घोषणा देत असल्याचे दिसून आले. तर गुरुनानक चौकात काही व्यापारी जल्लोषासाठी रस्त्यांवर आले होते. पण पोलिसांनी त्यांना परत पाठविले.

निकालानंतर पोलिस जास्त सतर्क झाल्याचे दिसत असले तरी सर्वसामान्य माणूस मात्र रस्त्यावर उतरत असल्याचे दुपारी दिसून आले. रस्त्यावरील वाहतूकही वाढली.  त्यातून अयोध्येचा नूर बदलला असल्याचेही दिसून आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख