avinash kokate ran away | Sarkarnama

संभाजी भिडेंच्या सभेत पोलिस व्यस्त होते, त्याचा गैरफायदा अविनाश कोकाटेने घेतला!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

संशयित आज शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडीतून पळून गेला.

नागाव (कोल्हापूर) : लूटमार प्रकरणातील संशयित अविनाश शांताराम कोकाटे ऊर्फ मछले (वय 20, रा. मोतीनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) आज शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडीतून पळून गेला. हा प्रकार सायंकाळी सातच्या सुमारास घडला. 

पुलाची शिरोली येथे सायंकाळी संभाजी भिडे यांची सभा होती. त्यामुळे तेथे मोठा बंदोबस्त तैनात होता. परिणामी, शिरोली पोलिस ठाण्यात पोलिसांचे संख्याबळ कमी होते. याचा गैरफायदा घेऊन कोकाटे पळून जाण्यात यशस्वी झाला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी : शिरोली येथील विलासनगर येथे 27 ऑक्‍टोबर 2018 रोजी दोघा परप्रांतीय कामगारांना तलवारीचा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकूण सात संशयितांना अटक केली होती. हा गुन्हा शिरोली हद्दीत घडल्यामुळे सर्वांना शिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. 

फरारी कोकाटेची कोठडीची मुदत उद्या (ता. 17) संपणार होती. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करायचे होते. आज सायंकाळी तो लघुशंकेचा बहाणा करून ठाणे अंमलदार यांच्यासोबत कोठडीतून बाहेर आला. पोलिस ठाण्याच्या आवारात त्याने ठाणे अंमलदाराच्या हाताला हिसडा मारून पोबारा केला.

सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी या प्रकाराची माहिती तत्काळ वरिष्ठांना दिली. करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी थेट शिरोली पोलिस ठाणे गाठले व फरारीला पकडण्यासाठी नाकाबंदी केली. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस पथके रवाना केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण, गांधीनगर, पेठवडगाव व करवीर पोलिस ठाण्यांनाही सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकाराने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव रात्री उशिरापर्यंत शिरोली पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख