पंकजा मुंडे म्हणाल्या ऐकतील, पोकळे यांचा मात्र संघर्षाचा पण कायम - You will hear Pankaja Munde say, but Pokale's struggle is still there | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे म्हणाल्या ऐकतील, पोकळे यांचा मात्र संघर्षाचा पण कायम

दत्ता देशमुख
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

सच्चा कार्यकर्ता म्हणून आपण भाजपकडे क्रमांक दोनची उमेदवारी मागितली होती. दखल घेतली नाही म्हणून आता ताकदीने संघर्ष करणार. 

- रमेश पोकळे

बीड : भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रमेश पोकळे उमेदवारी मागे घेतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला होता. मात्र, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने पूर्ण ताकदीने संघर्ष करण्याचा पण भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केला आहे. त्यांनी मराठवाडा पदविधर मतदार संघातून उमेदवारी कायम ठेवली आहे. 

विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारीचे भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. याच मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवून यापूर्वी रमेश पोकळे यांनी १७ हजार मते खेचली होती. दरम्यान, विद्यार्थी दशेपासूनच चळवळीत असलेले रमेश पोकळे मागच्या २३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सक्रिय आहेत. विविध राजकीय प्रवाहात काम करताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्न कायम अग्रस्थानी ठेवले.

कायम अनुदान धोरण, वेतणेत्तर अनुदान आशा प्रश्नांवर रान उठविणाऱ्या रमेश पोकळे यांनी मराठवाड्यात घरपोच पदवी वाटप अभियान राबवून हजारो पदवीधरांचे पदवी मिळविण्याच्या कटकटीतून मुक्तता करून त्यांचे पैसेही वाचविले. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना आपला संपर्क देखील वाढविला आहे. आता ते भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. याच बळावर उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

विशेष म्हणजे त्यांनी क्रमांक दोनची उमेदवारी भाजपने द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत तसा प्रस्ताव भाजपला दिला होता. मात्र, रमेश पोकळे भाजपचे सच्चे कार्यकर्ते असून त्यांची समजूत काढू, ते ऐकतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला होता. मात्र, मंगळवारी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी पोकळे यांची उमेदवारी कायम राहिली. उलट, आपण दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादाने पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करू, आश्चर्यकारक निकाल दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख