शिवसेना हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी देणार का ? 

हर्षवर्धन जाधव यांना शिवसेना पुन्हा संधी दणार का ? की हर्षवर्धन जाधव यांच्यासारख्या पक्षशिस्त आणि पक्ष नेतृत्वाला न जुमानणाऱ्या मनस्वी नेत्याला अन्य पक्ष निमंत्रण देतील काय ? की आमदार जाधव कन्नड तालुका विकास आघाडी स्थापन करून स्वबळावर लढणार हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल .
Kannad ss.
Kannad ss.

कन्नडः  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारे  विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव  यांना पुन्हा शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे . हर्षवर्धन जाधव यांचे काय होते याकडे त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक  उदयसिंग राजपूत  व  केतन काजे बारकाईने नजर ठेवून आहेत . 

हर्षवर्धन जाधव यांनी पक्षशिस्त झुगारून वेळोवेळी घेतलेली आक्रमक भूमिका शिवसेनेत अनेकांना पसंत नाही . खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी त्यांनी चालवलेला संघर्ष पक्षाला निवडणुकीच्या वर्षात परवडणारा नाही . जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना त्यांनी पक्षशिस्ती वरून केलेला उलटा उपदेश देखील बराच चर्चिला गेला . हर्षवर्धन जाधव यांनी  शिवसेनेच्या धुळे जिल्हा प्रमुखाविषयी केलेल्या   आक्रमक वक्तव्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदार विचलित होऊ शकतो असा दावा त्यांचे विरोधक करू लागले आहेत . त्यामुळे  शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत कार्यकर्ते शंका व्यक्त करीत आहेत . 

 शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी उडालेले खटके, मराठा आरक्षणावरून शिवसेनेच्या मंत्र्यांवर केलेले आरोप आणि इतर कारणांमुळे शिवसेनेला आमदार हर्षवर्धन जाधव  सध्या नकोसे झाल्याचे त्यांचे विरोधक  सांगतात . तर   पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हर्षवर्धन जाधवांची भूमिका समजून घेतील आणि पुन्हा त्यांना उमेदवारी देतील अशी आशा त्यांचे निकटवर्तीय  बाळगून आहेत. हर्षवर्धन जाधव यांच्या प्रतिमेचा शिवसेनेला अन्य मतदारसंघातही लाभ होईल असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत . 

 हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देत सरकारला धारेवर धरले होते . तसेच त्यांनी यानिमित्ताने मराठवाड्यातील बीड , उस्मानाबाद आणि अन्य काही जिल्ह्यात मराठा युवकांनी आत्महत्या करू नयेत म्हणून दौरे केले होते . या दौऱ्यात  त्यांनी युवकांच्या काउन्सिलिंग साठी मानसोपचार तज्ज्ञांचे पथक  सोबत ठेवले होते. आंदोलनाच्या काळात आपल्या आक्रमक बोलण्याने ते हिरो झाले आणि सोशल मीडियावर त्यांचा बराच गाजावाजा देखील झाला .  

विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर परिस्थितीचा अंदाज बांधून हर्षवर्धन जाधव स्वतः  शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील किंवा पक्ष त्यांना बाहेर पडण्यास भाग पाडेल अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. हे गृहित धरूनच त्यांचे विरोधक उदयसिंग राजपूत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. तर राजपूत यांच्या आधी राष्ट्रवादीचे केतन काजे हेही शिवसेनेत डेरेदाखल झाले होते. राजपूत आणि काजे कधीकाळी राष्ट्रवादीत एकमेकांचे स्पर्धक राहिलेले आहेत. 

विधानसभा लढवण्याची इच्छा असतांना राष्ट्रवादीने नेहमीच केतन काजे यांच्या ऐवजी उदयसिंग राजपूत यांना पंसती दिली होती. त्यामुळेच नाराज झालेल्या काजेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण त्यांच्या पाठोपाठ उदयसिंग राजपूतही शिवसेनेत आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी या दोघांनीही  शिवसेनेच्या  उमेदवारीवर दावा सांगितला आहे. 

त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना शिवसेना पुन्हा संधी दणार का ? की हर्षवर्धन जाधव यांच्यासारख्या पक्षशिस्त आणि पक्ष नेतृत्वाला न जुमानणाऱ्या मनस्वी नेत्याला अन्य पक्ष निमंत्रण देतील काय ? की आमदार  जाधव कन्नड तालुका विकास आघाडी स्थापन करून स्वबळावर लढणार हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com